लस कधी येणार आहे? रुग्ण घटले; जिल्हा हेल्पलाइनवर सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:05+5:302021-06-24T04:14:05+5:30
कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा कचेरीत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली होती. ...
कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा कचेरीत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली होती. जवळपास ४ महिन्यांपासून ही हेल्पलाइन अखंडित सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने देण्यात आली. पूर्वी कोणत्या दवाखान्यात बेड उपलब्ध आहेत? अशी विचारणा होत होती. नंतरच्या काळात ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत का? अशी मोठ्या प्रमाणात विचारणा होत होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे नागरिक लस कधी येणार आहे? लसीकरण कोठे सुरू आहे? मोबाइल ॲप व्यवस्थित चालत नाही. स्लॅट बुक होत नाही, अशा तक्रारी नागरिक या माध्यमातून करीत आहेत.
हेल्पलाइनकडूनही नागरिकांची विचारपूस
महानगरपालिकेकडून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची यादी मिळाल्यानंतर या रुग्णांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या हेल्पलाइनच्या माध्यमातूनही संपर्क साधण्यात येतो.
त्यामध्ये रुग्णांची प्रकृती कशी आहे, त्यांना काही वैद्यकीय मदत हवी आहे का? याबाबत विचारणा करण्यात येते.
सद्यस्थितीत दररोज या कार्यालयातून २० ते २५ जणांना फोन करण्यात येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
परभणी शहरातून सर्वाधिक कॉल्स
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून हेल्पलाइनला नागरिकांचे फोन येत असतात; परंतु परभणी शहरातून येणाऱ्या फोनचे प्रमाण अधिक आहे. सद्यस्थितीत लसीकरणाच्या अनुषंगानेच फोन कार्यालयात येत आहेत. येथे नियुक्त केलेले कर्मचारी मनपाकडून उपलब्ध झालेली यासंदर्भातील माहिती समोरील व्यक्तींना देतात.
तेव्हा इंजेक्शनची चौकशी
एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यावेळी रेमडेसिविर इंजेक्शनची अधिक प्रमाणात विचारणा हेल्पलाइनकडे होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.