मुक्कामी राहून जिल्हाधिकाऱ्यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:16+5:302021-06-20T04:14:16+5:30
पाथरी : पाण्याच्या कारणावरून दोन समाजात निर्माण झालेल्या वादानंतर १९ जून रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तालुक्यातील खेरडा येथे ...
पाथरी : पाण्याच्या कारणावरून दोन समाजात निर्माण झालेल्या वादानंतर १९ जून रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तालुक्यातील खेरडा येथे मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
तालुक्यातील खेरडा येथे पाण्याच्या कारणावरून दोन समाजात वाद निर्माण झाला होता. या प्रकारामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल होऊन आरोपींना अटकही करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १९ जून रोजी खेरडा या गावाला भेट दिली. ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि तक्रारदार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. गावात फिरून पाहणी केली. १९ जून रोजी दीपक मुगळीकर यांनी गावात मुक्काम केला. यावेळी गावातील आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, पीक कर्ज आदी समस्याही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या समस्या सोडविण्याच्या सूचनाही मुगळीकर यांनी दिल्या आहेत.
यावेळी तहसीलदार श्रीकांत निळे, गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त माळवदकर, पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सदाशिव थोरात, विष्णू सिताफळे, विजय पाटील सिताफळे, अविनाश आम्ले आदींची उपस्थिती होती.