खळबळजनक! अवैध वाळू उपस्यावर कारवाई करताना पूर्णा नदी पात्रात तलाठी बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 04:57 PM2023-05-25T16:57:55+5:302023-05-25T16:58:26+5:30
शोधकार्यासाठी एनडीआरएफ पथक दाखल, पोलीस, महसूल अधिकारी तळ ठोकून
जिंतूर (परभणी) : वाळू धक्याची पाहणी करण्यासाठी गेलेले तलाठी तोल जाऊन पूर्णा नदीत बुडाल्याची घटना तालुक्यातील दिग्रस येथे आज सकाळी घडली. सुभाष होळ असे तलाठ्याचे नाव असून नदीपात्रात शोधकार्य सुरु आहे.
जिंतूर तालुक्यातील डिग्रस या ठिकाणी पूर्णा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तलाठी सुभाष होळ व धनंजय सोनवणे व पोलीस पाटील हे धक्यावर गेले. धक्क्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी जिंतूर तालुक्याच्या हद्दीत वाळू उपसा बंद होता. मात्र, त्याच नदीच्या पलीकडे सेनगाव तालुक्याची हद्दीत वाळू धक्का चालू असल्याचे निदर्शनास आले. कॅनीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे दिसताच तलाठी सुभाष होळ ती दिशेने नदीतून पोहत निघाले. ७० टक्के अंतर पार केल्यानंतर अचानक तलाठी होळ पाण्यात बुडाले. काठावर जाण्याचा प्रयत्न करत असताना पोहताना त्यांना दम लागल्याने ते बुडाल्याचा अंदाज आहे. त्यावेळी नदी काठावर उपस्थितांनी त्यांना सापडण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही.
एनडीआरएफ पथक दाखल, अधिकारी तळ ठोकून
दरम्यान, माहिती मिळताच परभणी येथून एनडीआरएफचे पथक नदी पात्रात दाखल झाले. महसूल उपविभागीय अधिकारी संगेवार, प्रभारी तहसीलदार परेश चौधरी, सेलू तहसीलदार दिनेश सापले, नायब तहसीलदार प्रशांत खारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास खोले, मंडळ अधिकारी प्रशांत राखे यांच्यासह अनेकजण दिग्रस या ठिकाणी तळ ठोकून आहेत.