जिंतूर येथे सात हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकास पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 07:29 PM2017-12-26T19:29:58+5:302017-12-26T19:30:06+5:30
पोलीस ठाण्यातच सात हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला आज सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
जिंतूर: पोलीस ठाण्यातच सात हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला आज सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
या संदर्भात कवडा येथील गजानन झोडपे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार जिंतूर तालुक्यातील बामणी परिसरातील तोडलेल्या झाडांचे लाकडं घेऊन जाणारा एक ट्रक पोलिसांनी पकडला होता. हा ट्रक सोडून देण्यासाठी बामणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पांचाळ यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.
या तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने आज दुपारी बामणी पोलीस ठाण्यात सापळा लावला. तेव्हा तक्रारदाराकडून ७ हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पांचाळ यास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक एन.एन.बेंबडे, पोलीस निरीक्षक भारती, मुरकुटे, बोके, पवार, कटारे यांनी ही कारवाई केली.