शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:19 AM2021-09-11T04:19:26+5:302021-09-11T04:19:26+5:30

परभणी शहरात महापालिका झाल्यानंतर २०१२-१३ रोजी १०३ ठिकाणी शहरात होर्डिंग लावण्यासाठीच्या जागा निश्चित करून ठराव झाला होता. यानंतर पुन्हा ...

Who is responsible for the disfigurement of the city? | शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

Next

परभणी शहरात महापालिका झाल्यानंतर २०१२-१३ रोजी १०३ ठिकाणी शहरात होर्डिंग लावण्यासाठीच्या जागा निश्चित करून ठराव झाला होता. यानंतर पुन्हा टेंडर भरण्यात आले नाही. त्यामुळे हा ठराव रद्द झाला. या जागाही पर्यायाने रद्द झाल्या. त्यानंतर शहर झिरो होर्डिंग करण्यात आले. परंतु, असे असतानाही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, वसमत रोड, उड्डाणपूल परिसर, रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड, जिंतूर रोड या भागात सर्रास अनधिकृत होर्डिंग लावण्यात येत असल्याचे अनेकदा दिसून आले. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

या ठिकाणांकडे कोण लक्ष देणार?

शहरातील वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, जिंतूर रोड, शनिवार बाजार, रायगड कॉर्नर, जाम नाका, विसावा कॉर्नर यासह राष्ट्रीय महामार्ग परिसरात व गल्ली बोळामध्येही अनधिकृतरित्या होर्डिंग लावले जातात. परंतु, याकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासनाने हे सर्व अनधिकृत होर्डिंग हटविणे गरजेचे आहे.

ऑगस्ट महिन्यात झाली कारवाई

शहरात ऑगस्ट महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात ११३ ठिकाणच्या अनधिकृत होर्डिंग स्वच्छता विभागाने काढल्या होत्या. प्रभाग समिती व स्वच्छता विभागाने ही संयुक्त कारवाई आयुक्तांच्या आदेशानुसार केली होती. मात्र, यानंतरही काही ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले. त्या होर्डिंगवर ९ सप्टेंबर रोजी कारवाई केल्याचे दिसून आले.

काय होऊ शकते कारवाई

अनधिकृत होर्डिंग लावल्यास महापालिका प्रशासन संबंधितावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू शकते. यापूर्वी शहरामध्ये २०१४-१५ मध्ये २ ते ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाहीत. यामुळे मागील ५-६ वर्षात मोठी कारवाई झालेली नाही.

मनपाचा लाखोंचा महसूल बुडतोय

शहरात काही जणांचे वाढदिवस, नेत्यांचे दौरे तसेच विविध कार्यक्रम या निमित्ताने राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या चौकांमध्ये अनधिकृत होर्डिंग लावतात. होर्डिंग लावताना मनपाची परवानगी व कर भरला जात नाही. यामुळे शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग लागल्याने मनपा प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Who is responsible for the disfigurement of the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.