परभणीतील नाले का तुंबले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:06+5:302021-09-09T04:23:06+5:30

परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा परभणी शहरातील नाले तुंबून रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी तर काही वसाहतींमध्ये ...

Why are the nallas in Parbhani full? | परभणीतील नाले का तुंबले ?

परभणीतील नाले का तुंबले ?

Next

परभणी : यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा परभणी शहरातील नाले तुंबून रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी तर काही वसाहतींमध्ये ही घरात पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली नाही. अनेक वेळा ओरड करुन ही सांडपाणी वाहून जाण्याचे नियोजन न केल्याने परभणीकरांचे तारांबळ उडत आहे. मनपाच्या उदासीनतेचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या संसर्ग काळानंतर महापालिकेचा कारभार रामभरोसे झाला आहे. अनेक कामे पैशांविना ही होऊ शकतात. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये नियोजनाचा अभाव असल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. शहर विकासाच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. मनपा लक्ष देत नाही आणि नागरिक मनमानेल त्याप्रमाणे स्वत:पुरती उपाययोजना करतात परिणामी शहराच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे मागच्या काही ११ जुलै रोजी शहराच्या हद्दीत अतिवृष्टी झाली. या पहिल्याच अतिवृष्टीत अनेक वसाहतीत पाणी शिरले. बसस्थानक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने हा मार्ग बंद झाला. तर प्रथमच वसमत रस्ताही पाण्याखाली गेला होता. त्यावेळी शहरातील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली. मात्र मनपाने लक्ष दिले नाही. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा परभणीतील रस्ते तुंबले.

मंगळवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते अक्षरशः पाण्याखाली होते. मुख्य रस्त्याने पाण्याचे लोंढे वाहत होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसाेय झाली. मागील वेळे प्रमाणेच वसमत रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी होते. त्याचप्रमाणे शहरातील कच्छीबाजार, जनता मार्केट, गांधी पार्क, जिल्हा स्टेडियम परिसरात पाणीच पाणी झाले होते. नाल्या का तुंबल्या ? याचे आत्मपरीक्षण करुन मनपानेच आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

परस्पर अनेकांनी बुजविलेल्या नाल्या

शहरातील नागरिकांनीही परस्पर नाल्या बुजविलेल्या आहेत. तर काही जणांनी नाल्याचे पाणी मनाला वाटेल त्याप्रमाणे वळविले आहे. प्रशासकीय, वकील कॉलनी, देशमुख गल्ली, बसस्थानक परिसर, डॉक्टर लेन, जिल्हा स्टेडियम भागातील काही नाल्या बंद करण्यात आल्या आहेत तर नाल्यांचे पाणी विरुद्ध मार्गाने वळविले आहे. तसेच उघडा महादेव ते एमआयडीसी., ममता कॉलनी, वृंदावन कॉलनी, या भागात नालेच नसल्याने पाणी मुख्य रस्त्यावर येते.

नाल्यांवर ही अतिक्रमणे

शहरातील मोठ्या नाल्यांवर ही बिनधास्तपणे अतिक्रमणे झाली आहेत. विशेष म्हणजे, शासकीय जागांवर ही अतिक्रमणे करण्यात आली. काही जणांनी नाल्यांची रुंदी कमी केली असून, काहींनी तर चक्क नाल्या बुजविलेल्या आहेत. तर मुख्य बाजारपेठ भागात नाल्यांवर दुकाने थाटली आहेत. बसस्थानकासमोरील डिग्गी नाला तसेच वसमत रस्त्यावरील प्रमुख नाल्यावर अतिक्रमण झाल्याने पाणी वाहून जात नाही. त्यामुळे थोडाही पाऊस झाल्यास शहरातील रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी होत आहे.

Web Title: Why are the nallas in Parbhani full?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.