‘आमच्याच ट्रॅक्टरवर नेहमी कारवाई का करता?; जिंतूरमध्ये वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:16 PM2018-09-15T13:16:54+5:302018-09-15T13:22:32+5:30
अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर थांबविल्यानंतर वाळू माफियांनी पोलिसांवर दगडफेक करून हल्ला केला.
जिंतूर (परभणी ) : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर थांबविल्यानंतर वाळू माफियांनी केलेल्या दगडफेक आणि हल्ल्यात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. वझर ते बामणी या रस्त्यावर झालेल्या या घटनेत पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. यातील दोघे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर परभणीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, यावेळी एक आरोपीही जखमी झाला असून, त्यालाही परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, आज सकाळी वझर ते बामणी या रस्त्याने एका ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक केली जात होती. बामणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. सावंगी भांबळे गावात हे ट्रॅक्टर थांबवून रामोड यांनी चालकाकडे परवान्याची विचारणा केली. तेव्हा सखाराम मते, भगवान मते व इतर चार ते पाच जण त्या ठिकाणी आले.
‘आमच्याच ट्रॅक्टरवर नेहमी कारवाई का करता? अशी विचारणा करुन आरोपींनी सहायक पोलीस निरीक्षक रामोड यांना धक्काबुक्की केली. काही आरोपींनी पोलीस नाईक मनोज राठोड आणि हेड कॉन्स्टेबल आर.एम. हाके यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. तसेच पोलीस कर्मचारी श्रीराम दंडवते, चालक चोपडे यांनाही मारहाण केली. त्यानंतर आरोपी ट्रॅक्टर घेऊन पळून जात असताना पोलीस पाठलाग करीत असल्याने आरोपींनी पोलिसांवर दगडफेकही केली.
दरम्यान, या घटनेत रामोड यांच्यासह चोपडे, दंडवते यांना किरकोळ मार लागला असून, पोलीस कर्मचारी मनोज राठोड आणि आर.एम. हाके यांना गंभीर मार असल्याने त्यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या घटनेत सखाराम मते यासही मार लागला असून, त्याच्यावर देखील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.