कर्जामुळे शेतकऱ्याने जीवन संपवल्यानंतर विष प्राशन केलेल्या पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:33 IST2025-04-17T14:32:24+5:302025-04-17T14:33:09+5:30
परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील घटना

कर्जामुळे शेतकऱ्याने जीवन संपवल्यानंतर विष प्राशन केलेल्या पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू
दैठणा (जि. परभणी) : कर्जाला कंटाळून शेतकरी पतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती. यानंतर, पतीच्या निधनाची वार्ता समजताच पत्नीनेही विष प्राशन केले होते. यानंतर संबंधित पत्नीचा उपचाराच्या दरम्यान मंगळवारी रात्री नांदेड येथे मृत्यू झाला.
परभणी तालुक्यातील माळसोना गावातील सचिन जाधव या तरुण शेतकऱ्याने बँकेचे कर्ज आणि बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून १३ एप्रिलला विष प्राशन केले होते. यात सोमवारी त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. त्याच दिवशी पतीच्या मृत्यूची ही वार्ता समाजमाध्यमाद्वारे समजल्यावर पत्नी ज्योती जाधव हिनेही कीटकनाशक प्राशन केले.
ज्योती जाधव यांच्यावर प्रथम परभणी व त्यानंतर नांदेडला उपचार सुरू होते. उपचाराच्या दरम्यान मंगळवारी रात्री साडेआठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. तरुण पती-पत्नीने आत्महत्या केल्याने माळसोन्ना गावावर शोककळा पसरली आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे या दाम्पत्याच्या दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत.