सात कोरोना केअर सेंटर रुग्णांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:40+5:302020-12-29T04:14:40+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर घटला असून, कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या सात कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या एकही ...

Without seven corona care center patients | सात कोरोना केअर सेंटर रुग्णांविना

सात कोरोना केअर सेंटर रुग्णांविना

googlenewsNext

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर घटला असून, कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या सात कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण उपचार घेत नाही.

एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने परभणी शहरासह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोरोना केअर सेंटर तयार केले होते. या केंद्रांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. मागील दोन आठवड्यांपर्यंत पूर्णा, गंगाखेड येथील कोरोना केअर केंद्रात रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र, आता ही संख्याही घटली आहे. त्यामुळे बहुतांश कोरोना केअर सेंटर रुग्णांविना ओस पडले आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाबरोबरच परभणी शहरातही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, अक्षदा मंगल कार्यालय, रेणुका मंगल कार्यालय या ठिकाणी कोरोना केअर केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे केंद्र महिनाभरापूर्वीच बंद करण्यात आले. त्यामुळे आता केवळ जिंतूर रोडवरील आय.टी.आय. हॉस्पिटल या एकाच ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

पाथरी, मानवत, पूर्णा, पालम, सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालय आणि गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र, सध्या या एकाही रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण उपचार घेत नाही. रुग्णांची संख्या कमी झाल्याने आता या तालुक्यात आढळलेल्या रुग्णांवर थेट परभणी येथेच उपचार केले जात आहेत. याच पद्धतीने रुग्णांची संख्या घटल्यास तालुकास्तरावरील कोरोना केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय आरोग्य प्रशासन घेऊ शकते.

एकाच ठिकाणी रुग्णांवर उपचार

परभणी शहरातील कोरोना केअर सेंटर दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, आता तेथेही उपचार करणे बंद करण्यात आले असून, आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये एकाच ठिकाणी उपचारांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये सध्या अतिदक्षता विभाग, कोरोना केअर सेंटर, तसेच ओपीडी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.

होम आयसोलेशनचाही परिणाम

विलगीकरणाची सुविधा, स्वतंत्र स्वच्छतागृह घरी उपलब्ध असल्यास रुग्णांना त्यांच्या घरी राहूनच उपचार करण्याची सुविधा आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनचा लाभ घेत आहेत. त्याचाही परिणाम रुग्णालयांतील रुग्णसंख्या घटण्यावर झाला आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून होम आयसोलेशनचे रुग्ण वाढले आहेत.

Web Title: Without seven corona care center patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.