मराठवाड्यातील शिल्पाविष्कार संपन्न इतिहासाचा साक्षीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:20+5:302021-01-10T04:13:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : आपल्या देशातील समाजाची पराभूत मनोवृत्ती बदलायची असेल तर संपन्न भूतकाळाचा मागोवा घ्यावा लागेल. दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आपल्या देशातील समाजाची पराभूत मनोवृत्ती बदलायची असेल तर संपन्न भूतकाळाचा मागोवा घ्यावा लागेल. दोन हजार वर्षांखालील शिल्पाविष्कार आपल्या संपन्न इतिहासाचा साक्षीदार आहे. त्याचे संगोपन करावे, असे आवाहन इतिहासतज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव यांनी केले.
येथील गणेश वाचनालयाने आयोजित केलेल्या कै. मुकुंदराव पेडगावकर स्मृती व्याख्यानात ते ‘महाराष्ट्रातील शिल्पवैभव’ या विषयावर बोलत होते. यावेळी गेवराई तालुक्यातील पाठसरा येथे अनाथाश्रम चालवणाऱ्या संतोष गर्जे यांचा ‘लोपामुद्रा पुरस्कार’ देऊन सपत्निक गौरव करण्यात आला. डॉ. देव म्हणाले, वेरूळ, अजिंठा येथील लेण्यांखेरीज महाराष्ट्रात राष्ट्रकुट, सातवाहन, चालुक्य व यादवांच्या काळातील पुरातन मंदिरे असून, मराठवाड्यात तर त्याची संख्या शेकडोत आहे. या प्रदेशाच्या संपन्नतेचे प्रतीक असणारी अनेक मंदिरे उद्ध्वस्त अवस्थेत शेवटचा श्वास मोजत आहेत. ही मंदिरे आमच्या समृद्ध शिल्पाविष्काराचे पुरावे आहेत. आमच्या शिल्पकारांनी दगडात जीव ओतून स्वान्त सुखाय, समष्टीच्या रूपात केलेला हा शिल्पाविष्कार आपल्या समाजजीवनाचे दर्शन आहे. पूर्वजांच्या कलेचा आदर करणे, संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे. परधर्मियांनी आमची अस्मिता असणाऱ्या मंदिरांची नासधूस केली म्हणून आपण ओरड करतो, मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत आपण आपल्या मंदिर व शिल्पांना कितपत न्याय दिला? याचाही विचार करावा, असेही ते म्हणाले. आपली धरोहर आपणच जपली पाहिजे, हा संस्कार आपला समाज विसरत चाललेला आहे, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. संतोष गर्जे यांनी सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना लोपामुद्रा पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.