पोलिसानेच केला महिलेचा खून ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:37 PM2020-10-08T14:37:28+5:302020-10-08T14:39:11+5:30
वांगी रोड भागातील सागर कॉलनी येथील एका महिलेच्या खून प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याविरूद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे सकृतदर्शनी वाटत असले तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
परभणी : वांगी रोड भागातील सागर कॉलनी येथील एका महिलेच्या खून प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याविरूद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे सकृतदर्शनी वाटत असले तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मयत रमाबाई विठ्ठल सदावर्ते यांच्या मुलीने नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीनुसार आजोबांनी दिलेले पैसे काही जण परत करीत नसल्याने तक्रारकर्त्या मुलीच्या आईने नानलपेठ पोलीस ठाणे गाठले. तेव्हा नानलपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष जाधव यांनी हे पैसे मिळवून देतो, असे त्यांना सांगितले. तेव्हापासून मुलीची आई आणि जाधव यांची ओळख झाली होती.
दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ च्या सुमारास या मुलीच्या आईला पोलीस कर्मचारी जाधव यांचा फोन आला आणि त्या कागदपत्रे दाखवून येते, असे सांगून रमाबाई घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्या रात्री घरी परतल्याच नाहीत.
दि. ७ रोजी सरकारी दवाखान्याच्या पोलीस चौकीतून अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय सरकारी दवाखान्यात गेले तेव्हा रमाबाई यांचा मृतदेह दिसून आला. पोलीस कर्मचारी जाधव यांनीच आई रमा सदावर्ते यांचा खून केला असल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने नोंदविली आहे. त्यावरून नानलपेठ पेालीस ठाण्यात संतोष यांच्याविरूद्ध कलम ३०२ तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपअधिक्षक अमोल गायकवाड पुढील तपास करत आहेत.