मानवत येथे मराठा आरक्षणासाठी महिला आणि विद्यार्थिनींचा मोर्चा; तालुक्यात दोन बसवर दगडफेकीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 06:33 PM2018-08-08T18:33:27+5:302018-08-08T18:37:58+5:30
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
मानवत (परभणी ) : मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातील महिला आणि विद्यार्थिनींनी आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यासोबतच तालुक्यात दोन बसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली.
नगरपालिकेपासून निघालेला हा मोर्चा भाजी मंडई, कापड मार्केट, पोलीस ठाणे, पाथरी नाका, आठवडे बाजार, बसस्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गे तहसील कार्यालय परिसरात पोहचला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चात सहभागी विद्यार्थी आणि महिलांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार निलम बाफना यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. पोलीस निरीक्षक मिना कर्डक, सपोनि प्रविण दिनकर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.
दोन बसवर दगडफेक
पाथरी येथून परभणीला जाणाऱ्या बसवर सावळी शिवारात आज सकाळी दहा वाजता जमावाने तुफान दगडफेक केली. यात बसचे मोठे नुकसान झाले. यावेळी बस जाळण्याचाही प्रयत्न केला करण्यात आला. तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ परभणी - बीड या शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही बस चालकाच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे.