दारूबंदीसाठी उमिरीतील महिलांनी पेटविली मशाल; ग्रामपंचायतीनेही घेतला ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 06:36 PM2021-10-23T18:36:38+5:302021-10-23T18:38:01+5:30
परभणीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या उमरी या गावात पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने राजरोसपणे दारू तळीरामांना उपलब्ध होत आहे.
परभणी : तालुक्यातील उमरी येथे तळीरामांच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी शुक्रवारी मशाल मोर्चा काढून दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. महिलांचा आक्रमकपणा पाहून ग्रामपंचायतीनेही गावात दारूबंदीचा ठराव घेऊन अवैध धंद्याविरोधात एकजुटीची मूठ आवळल्याचा प्रकार पाहावयास मिळाला.
परभणीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या उमरी या गावात पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने राजरोसपणे दारू तळीरामांना उपलब्ध होत आहे. तळीरामांची संख्या वाढल्याने गावात दारू विक्री करणाऱ्यांची संख्याही वाढली. परिणामी या तळीरामांचा महिलांसह अबालवृद्धांना मोठा त्रास होऊ लागला. यातून वादावादीचे प्रकार घडू लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गावात दारूबंदी करण्याचा निश्चय केला. रात्री ॲड. माधुरी क्षीरसागर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शुक्रवारी महिलांनी मशाल मोर्चा काढून दारूबंदीसाठी एल्गार पुकारला.
महिलांचा उत्साह पाहून अनेक पुरुषांनीही या मोर्चात सहभाग नोंदविला. यावेळी दारू विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली. तसेच यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर ग्रामसभा घेऊन त्यात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. त्यानंतर यावेळी उपस्थित दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्याकडे याबाबत तक्रार देण्यात आली. दारूबंदीसाठी उपसरपंच रेखा मोरे, ग्रा. पं. सदस्य सत्यभामा गोरे, अनुसया गोरे, श्रीमती कांबळे, प्रसाद गोरे, कृष्णा गोरे, भारत गोरे, महेश गोरे, नागेश गोरे, पंडित गोरे, वैजनाथ गोरे, रामा हिंगे, ऋषीकेश गोरे, सतीश जांभळे, माणिक लबडे आदींची पुढाकार घेतला.