२५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांची लागणार वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:22+5:302021-01-24T04:08:22+5:30
पाथरी: तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता उमेदवार व पॅनल प्रमुखांचे लक्ष सरपंच निवड इकडे लागले आहे. ...
पाथरी: तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. आता उमेदवार व पॅनल प्रमुखांचे लक्ष सरपंच निवड इकडे लागले आहे. तालुक्यातील ४२ ग्रा.प.पैकी २५ ग्रामपंचायतीवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. त्यासाठी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. त्यामुळे सरपंचपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे ग्रामस्थ आणि राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित गटाकडे ४२ पैकी ३७ ग्रामपंचायती आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा गट मजबूत झाला आहे. पाथरी तालुक्यातील ४२ ग्रा.पं.पैकी ८ ग्रामपंचायती या अनुसूचित जातीसाठी राखीव असून यातील चार ग्रामपंचायती अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहेत. १३ ग्रामपंचायती नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी राखीव असून यातील ७ ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गामधील महिलांसाठी राखीव आहेत. २८ ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून त्यातील १४ ग्रामपंचायत या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांची वर्णी लागणार आहे.
आरक्षण सोडतीकडे लागले लक्ष
राज्य शासनाने निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक निकालानंतर घेतला आहे. त्यानुसार २५ जानेवारी रोजी पाथरी येथील महात्मा फुले मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार आहे. याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.