अधिकारी ते अंमलदार, परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला कारभारी
By राजन मगरुळकर | Updated: March 8, 2025 18:02 IST2025-03-08T15:35:30+5:302025-03-08T18:02:26+5:30
Women's Day Special: परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला दिनाचा उपक्रम

अधिकारी ते अंमलदार, परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला कारभारी
परभणी : केवळ महिलांचा सन्मानच नव्हे तर त्यांच्या अंगी असलेल्या जबाबदार आणि कर्तव्यदक्ष पोलीसिंगची दखल घेत महिला दिनाच्या निमित्ताने आगळावेगळा उपक्रम राबविण्याची संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी राबविली. शनिवारी परभणी शहरातील नानलपेठ ठाण्यामध्ये प्रभारी अधिकारी ते महिला अंमलदार अशा सर्वच विभागांची जबाबदारी महिलांनी सांभाळावी, याकरिता त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. याच महिलांनी वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी चोखपणे सांभाळून महिला दिनाचे महत्त्व समाजालाही पटवून दिले.
जागतिक महिला दिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात कार्यरत महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान केला. नानलपेठ पोलीस ठाण्याचे कामकाज महिलांच्या हाती सोपविले. नानलपेठचे प्रभारी पोलीस अधिकारी सपोनि. सुशांत किनगे यांनी महिला दिनाच्या प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वाती कावळे यांच्याकडे पदभार दिला. यानिमित्त एकूण बारा विभागांमधील ठाण्याचा कारभार महिला पोलिसांच्या हाती दिला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन प्रभारी अधिकारी ते महिला कर्मचारी या सर्वांचा सन्मान केला. यावेळी संतोष सानप, निलेश कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
महिलांसाठी शिबिराचे आयोजन
नानलपेठ ठाण्यात शनिवारी दुपारी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
यांनी सांभाळले कामकाज
अंमलदार म्हणून करुणा मालसमिंदर, स्वागत कक्ष शामल धूरी, क्राइम रायटर शेख निषाद, गोपनीय शाखा सुनंदा साबणे, ज्येष्ठ नागरिक कक्ष अहिल्या सुरनर, पोलीस निरीक्षक राईटर शालिनी पवार, सीसीटीएनएस अंजली हेंद्रे, वायरलेस राधा पवार, बारनिशी अबोली भोसले, हजेरी मेजर श्यामबाला टाकरस, सीसीटीएनएस अर्ज भरणे बजास बोबडे, अंमलदार मदतनीस अर्चना पवार, नांदुरे यांनी हे कामकाज पाहिले.