परभणीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी महिलांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:26 AM2018-09-22T00:26:50+5:302018-09-22T00:27:31+5:30
जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी महिलांनी एकत्र येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याला शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी महिलांनी एकत्र येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
परभणीत शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी खा.बंडू जाधव यांनी ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यात आंदोलन उभे केले आहे. या अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. ११ सप्टेंबर रोजी याच मागणीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. शुक्रवारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी उचलून धरली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकाळी ११ वाजेपासून महिला एकत्र येण्यास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, कॉ.माधुरी क्षीरसागर, डॉ.मीनाताई परतानी, डॉ.संध्याताई दुधगावकर, आधार कामगार युनियनच्या अनिता सरोदे, लायन्स क्लबच्या प्रभावती अन्नपूर्वे, हेमाताई रसाळ, श्रृती जोशी, वर्षा चव्हाण, सरोज देशपांडे, लताबाई परभणे, परिचारिका मेघना देशमुख, विमल काकडे, विद्यार्थिनी कोमल विश्वब्रह्मा, सुशिला निसर्गन आदींनी उपस्थित महिलांसमोर मनोगत व्यक्त केले.
परभणी जिल्ह्यात कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व सुविधा उपलब्ध असताना तसेच या ठिकाणी महापालिका अस्तित्वात असताना वैद्यकीय महाविद्यालयासाठी जाणून बुजून डावलले जात आहे. परभणीकरांना आंदोलनाशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे हे महाविद्यालय मंजूर होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. महिला प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
लढा तीव्र करणार : खा.बंडू जाधव
यावेळी उपस्थित महिला आंदोलकांना मार्गदर्शन करताना खा.बंडू जाधव म्हणाले, परभणी येथे सर्व सुविधा असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाणून बुजून डावलण्यात आले. परभणीसोबत महापालिका झालेल्या लातूर येथे खाजगी व शासकीय महाविद्यालय पूर्वीपासूनच आहे. चंद्रपूर येथे नव्याने वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. ब वर्ग नगरपालिका असताना उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले.
परभणीला सर्व सुविधा आणि महापालिका असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का डावलले? असा सवाल करीत शासनाने त्याचा खुलासा करावा व वैद्यकीय महाविद्यालयास त्वरीत मंजुरी द्यावी. वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास परभणीतील नागरिकांच्या आरोग्यासह शिक्षणाचाही प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन घेण्यासाठी उभारलेला हा लढा आणखी तीव्र करणार असल्याचे खा.बंडू जाधव यांनी सांगितले.
महिला पोलिसांचा बंदोबस्त
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचाºयांची बंदोबस्तकामी नियुक्ती केली होती. पुरुष कर्मचाºयांपेक्षा महिला कर्मचाºयांची संख्या अधिक होती.
घोषणांनी दणाणला परिसर
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर पोलिसांना त्यांना प्रवेशद्वाराजवळच अडविले. त्यानंतर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘खा.बंडू जाधव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेच पाहिजे’, ‘महिला एकजुटीचा विजय असो’, ‘मिळत कसे नाही, मिळालेच पाहिजे’, ‘वैद्यकीय महाविद्यालय आमच्या हक्काचे...’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.