सेलूच्या स्वतंत्र वीज वाहिनीचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 08:33 PM2018-04-25T20:33:27+5:302018-04-25T20:33:27+5:30
सेलू शहराला सुरळीत वीज पुरवठा करणाऱ्या पाथरी येथील १३२ केव्ही वीज केंद्रातून सेलू येथील ३३ केव्ही वीज केंद्राला स्वतंत्र वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
सेलू (परभणी ) : सेलू शहराला सुरळीत वीज पुरवठा करणाऱ्या पाथरी येथील १३२ केव्ही वीज केंद्रातून सेलू येथील ३३ केव्ही वीज केंद्राला स्वतंत्र वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, हे काम काही दिवसांपासून रखडल्याने तालुक्यातील ग्राहकांना विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सेलू येथे १३२ केव्ही वीज केंद्र नाही. त्यामुळे पाथरी येथून सेलू शहरासह गुगळी धामणगाव, डासाळा या ३३ केव्ही वीज केंद्राला वीज पुरवठा करण्यात येतो. विजेची मागणी वाढत असल्याने जुन्या वाहिनीद्वारे वीज पुरवठा करताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. इन्फ्रा योजनेतून २०१६-१७ साली सेलू ते पाथरी या सेलू शहरातील स्वतंत्र वीज वाहिनीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. वाहिनीचे काम सुरु झाल्यानंतर तीन ठिकाणी विविध कारणांमुळे काम रखडले होते. परंतु, या विभागाने शेतकऱ्यांशी चर्चा केल्याने हे काम पुन्हा सुरु झाले. मात्र पुन्हा गुगळी धामणगाव येथे वीज वाहिनीचे काम बंद पडले आहे. सेलूपर्यंत वीज वाहिनीला येण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागत आहेत. डासाळा येथील ३३ केव्हीपर्यंत ही वाहिनी नेण्याची गरज निर्माण झाली आहे. डासाळा येथून जुन्या लाईनद्वारे सेलूपर्यंत वीज पुरवठा केला जावू शकतो. परंतु, काम थांबल्याने महावितरणला वीज पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.
विजेच्या समस्यांना ग्राहक वैतागले
सेलू तालुक्यामध्ये स्वतंत्र १३३ केव्ही नसल्याने शहरासह तालुक्यात कमी दाबाने वीज पुरवठा होतो. परंतु, अनेकवेळा वारे व पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे. उन्हाळ्यात तर विजेची मागणी वाढत असल्याने वीज पुरवठा करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्राहकांनाही वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
काम पूर्ण करण्याचा लवकरच प्रयत्न
सेलू येथे जोडल्या जाणाऱ्या स्वतंत्र वीज वाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गुगळीधामणगाव येथे हे काम एका शेतकऱ्याने अडविले आहे. काम पूर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविला जाणार आहे. डासाळापर्यंत तरी लाईनचे काम झाले तरी सेलू शहराला तसेच गुगळी धामणगाव, डासाळा येथील ३३ केव्ही अंतर्गत गावांना चांगली वीज मिळेल. काम पूर्ण झाल्यानंतर ७० टक्के समस्या कमी होतील, अशी माहिती उपअभियंता राजेश मेश्राम यांनी दिली.