सौरऊर्जा प्रकल्पाचे दोन वर्षांपासून रखडले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:11 AM2021-02-22T04:11:42+5:302021-02-22T04:11:42+5:30
येलदरी : जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माफक दरात दिवसा बारा तास वीज मिळावी, या उद्देशाने सावंगी म्हाळसा परिसरात ५ मेगावॅटच्या ...
येलदरी : जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माफक दरात दिवसा बारा तास वीज मिळावी, या उद्देशाने सावंगी म्हाळसा परिसरात ५ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे संबंधित विभागाने या जागेची पाहणी करून या ठिकाणी संरक्षक भिंतही बांधली. मात्र, त्यानंतर मागील दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ ६ तासच वीज मिळत आहे.
महावितरण कंपनीकडून कृषी पंपासाठी देण्यात येणारी वीज ही अपुरी पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक विजेचा पुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाने जिंतूर तालुक्यातील म्हाळसा सावंगी येथील गायरान जमिनीमध्ये ५ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर २०१७मध्ये या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर सौर प्रकल्पासाठी सावंगी म्हाळसा येथील जागा योग्य असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे महानिर्मिती कंपनीकडून पाठविण्यात आला. त्यानुसार शासनाकडून मराठवाडा विभागातील संभाव्य ५० मेगावॅट वीज निर्मितीपैकी ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सुरक्षा भिंतही बांधण्यात आली. त्याुमळे आगामी काळात येलदरी, सावंगी म्हाळसा व परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा होईल, त्याचबरोबर या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा पर्याय उपलब्ध होऊन शेतीतील उत्पादनामध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांंना होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून हा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली थंड बस्त्यात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.
केवळ ६ तास वीजपुरवठा
एकीकडे ५ मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम रखडले आहे, तर दुसरीकडे सावंगी म्हाळसा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून शेतकऱ्यांना केवळ सहा तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीमध्ये घट जाणवत आहे. याकडे महावितरण कंपनीने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येलदरी व सावंगी म्हाळसा येथील ग्रामस्थांतून होत आहे.