काम देता का काम? रोजगारासाठी साडेपाच हजार उमेदवारांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:22 AM2021-09-07T04:22:42+5:302021-09-07T04:22:42+5:30
परभणी : मागील दोन वर्षांत कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली तर बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहेत. ...
परभणी : मागील दोन वर्षांत कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली तर बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहेत. अशा परिस्थितीत येथील जिल्हा स्वयंरोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे कामाची मागणी करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे.
स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमध्ये यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत ५ हजार ७२८ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. कामाची मागणी करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक बेरोजगार उमेदवाराला काम देण्यासाठी स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाइन मेळावे घेतले जात असून, उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील दोन वर्षांच्या काळात परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक क्षेत्रातील रोजगार कमी झाले असून, कामाची मागणी करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे; मात्र सद्यस्थितीला आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठीच स्वयंरोजगार केंद्रातून प्रशिक्षणही दिले जात असून, उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यास त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
एक हजार उमेदवारांना रोजगार
येथील स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या ५ हजार ७२८ उमेदवारांपैकी १ हजार ८३ उमेदवारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
नोंदणी केलेल्या काही उमेदवारांचे प्रशिक्षण सध्या सुरू असून त्यांनाही आगामी काळात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
अनेकांनी पकडली मुंबई-पुण्याची वाट
कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई-पुणे या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित झालेले अनेक युवक जिल्ह्यात दाखल झाले होते. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने कामाच्या शोधात पुन्हा एकदा मुंबई-पुण्याकडे ओढा वाढला आहे.
विशेष म्हणजे शहरी भागासह ग्रामीण भागातूनही मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या बेरोजगार युवकांची संख्या अधिक आहे.
सध्याची परिस्थिती पाहता आरोग्य क्षेत्रात बेरोजगारांसाठी मोठ्या संधी आहेत. आरोग्य क्षेत्रातील रोजगारासाठी प्रशिक्षण आणि लगेच पात्र उमेदवारांची नोकरीची योजनाही सुरू आहे. त्यासाठी एनआयसीच्या संकेतस्थळावर तसेच स्वयंरोजगार केंद्राच्या संकेतस्थळावर बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी करावी. कोरोनाच्या संसर्गामुळे ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळावे घेऊन बेरोजगार उमेदवारांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
पी. व्ही. देशमाने, सहायक संचालक
कोणत्या महिन्यात किती नोंदणी
जानेवारी ५६०
फेब्रुवारी ८२१
मार्च १४००
एप्रिल १०५७
मे १९१
जून ५८१
जुलै ७८५
ऑगस्ट ३३३
कोणत्या वर्षी किती नोंदणी
२०१५ : ४५४९७
२०१६ : ४१४८३
२०१७ : ५२०२५
२०१८ : ८१८८५
२०१९ : ९९४३०
२०२० : १०५६५२
२०२१ (ऑगस्टपर्यंत) ५७२८