निधीअभावी २९ कोटी रुपयांची कामे पाच महिन्यांपासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:58+5:302021-01-17T04:15:58+5:30
परभणी : येथील राष्ट्रीय परिवहन महामार्गाच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ५ आगारांतर्गत जवळपास २९ कोटी रुपयांची कामे मागील पाच ...
परभणी : येथील राष्ट्रीय परिवहन महामार्गाच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ५ आगारांतर्गत जवळपास २९ कोटी रुपयांची कामे मागील पाच महिन्यांपासून निधीअभावी ठप्प आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रीय परिवहन महामार्गांतर्गत परभणी येथे विभागीय नियंत्रक कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयांतर्गत परभणी, पाथरी, गंगाखेड या कार्यालयांसह हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, या आगारांचाही समावेश आहे. प्रवाशांच्या प्रवासासह त्यांना भौतिक सुविधा मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय परिवहन महामार्ग एस.टी. महामंडळाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जातात. त्याच अनुषंगाने परभणी येथील बसस्थानकाचे रूपांतर बसपोर्टमध्ये करणे आदीसह इतर कामे करून प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र, मागील पाच महिन्यांपासून या महामंडळांतर्गत पाच आगारांमधील २९ कोटींची कामे निधीअभावी ठप्प आहेत. यामध्ये परभणी आगारातील बसपोर्टच्या कामाचा ६० लाख रुपयांचा निधी एस.टी. महामंडळ प्रशासनाकडे थकीत आहे. त्यामुळे हे काम मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. त्याचबरोबर पाथरी आगारात शिवशाही बससाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधाही २० लाख रुपयांच्या निधीअभावी ठप्प आहेत. याचबरोबर जिंतूर आगारात छोटी-मोठी कामे सुरू आहेत. मात्र, संबंधित ठेकेदाराचे पैसे थकल्याने हे कामही बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील बसस्थानकाचे काम १० कोटी रुपयांअभावी बंद पडले आहे, तसेच वसमत येथील बसस्थानकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. निविदा मागवून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, निधीअभावी या कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे २९ कोटी रुपयांअभावी सर्व कामे ठप्प आहेत.
बसस्थानकाचा प्रस्ताव धूळखात
गंगाखेड येथील बसस्थानकाची इमारत मोडकळीस आली असून, ती धोकादायक बनली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयातून या बसस्थानकाची जमीन उद्ध्वस्त करून नवीन बसस्थानक उभारणीसाठीचा प्रस्ताव मुंबई येथील एस.टी. महामंडळ प्रशासनाकडे मागील अनेक दिवसांपासून धूळखात आहे.