नागपंचमीनिमित्त नागदेवतेचे मंदिरामंध्ये पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:13+5:302021-08-14T04:22:13+5:30
परभणी शहरात गुलशनाबाग तसेच नागराज काँर्नर परिसरात नागराज मंदिर आहे. या दोन्ही मंदिरात दरवर्षी नागदेवतेचे पुजन केले जाते. ...
परभणी शहरात गुलशनाबाग तसेच नागराज काँर्नर परिसरात नागराज मंदिर आहे. या दोन्ही मंदिरात दरवर्षी नागदेवतेचे पुजन केले जाते. या मंदिरात महिलांची दर्शनासाठी गर्दी होते. गुलशनाबाग परिसरात रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षापासून नागोबाच्या दगडी मुर्ती आहेत. यांचे विधिवत पूजन केले जाते. या परिसरात शुक्रवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पूजाअर्चा करण्यासाठी खंडोबा बाजार, धार रोड तसेच देशमुख गल्ली आणि सुपर मार्केट परिसरातून महिलांची ये-जा सुरु होती. येथे मंडप उभारून विविध पूजेचे साहित्य आणि विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. तसेच शहरातील नागराज कॉर्नर परिसरातील नागराज मंदिर येथेही महिलांची पूजनासाठी गर्दी झाली होती. घरोघरी नागपंचमीनिमित्त नागाचे चित्र कागदावर काढून त्याचे पूजन करण्यात आले व नैवेद्य दाखविण्यात आला.
झोपाळ्यांचे प्रमाण झाले कमी
नागपंचमीनिमित्त महिला व मुली झाडाला तसेच मोकळ्या जागेत झोपाळे बांधून त्यावर उंच झोका घेऊन नागपंचमी साजरी करतात. यानिमित्त उंच झोके घेण्याची स्पर्धा विविध ठिकाणी होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम असली तरी या वर्षी हे बांधलेल्या झोपाळ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात यंदा झोपाळे दिसून आले नाही. ग्रामीण भागात वडाच्या झाडाला तसेच अन्य झाडांना झोपाळे बांधून महिला या झोक्याचा आनंद लूटतात.
बांगड्या, साडी खरेदीसाठी गर्दी
नागपंचमीनिमित्त लेकीबाळींना बांगड्या घेणे तसेच साडी व ड्रेस खरेदी करणे याचेही महत्व आहे. ग्रामीण भागात नागपंचमीनिमित्त माहेरी येणाऱ्या महिलांना साडी खरेदी करण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही कायम आहे. शबरातील बाजारात मागील काही दिवसांपासून खरेदीसाठी रेलचेल दिसून आली.