येलदरी दाखल झाले साडेपाच दलघमी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:23 AM2021-08-18T04:23:28+5:302021-08-18T04:23:28+5:30
यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येलदरी प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पाण्याने भरेल, अशी अपेक्षा निर्माण ...
यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येलदरी प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पाण्याने भरेल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. जून आणि जुलै असे दोन महिने प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. सद्यस्थितीला या प्रकल्पामध्ये ७५.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मागील २२ दिवसांपासून पावसाने ताण दिल्यामुळे प्रकल्पात नवीन पाणीसाठा दाखल झाला नव्हता. मात्र दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे. मागील २५ तासांमध्ये या प्रकल्पात ५.७८ दलघमी पाण्याची आवक झाली असून प्रकल्पाच्या जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ही ७५.३४ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ग्रामस्थांना दिलासा सतर्कतेचा इशारा
या प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या सिद्धेश्वर प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या प्रकल्पात सध्या ४१३ मीटर पाणी पातळी निर्माण झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ०.३७ मीटर पाणीपातळी शिल्लक आहे. दरम्यान हवामान खात्याने आणखी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात केव्हाही वाढ होऊन प्रकल्पातून पाणी सोडले जाऊ शकते. तेव्हा नदीपात्र शेजारील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असा इशारा हट्टा पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.