येलदरी प्रकल्पात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:18 AM2021-03-23T04:18:34+5:302021-03-23T04:18:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी: जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला ६९.६८ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असून, या पाण्याच्या भरवशावर ...

In the Yeldari project | येलदरी प्रकल्पात

येलदरी प्रकल्पात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी: जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला ६९.६८ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असून, या पाण्याच्या भरवशावर उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. ६ वर्षांनंतर प्रथमच पावसाळ्यापूर्वीच येलदरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला होता. पावसाळ्याच्या काळात अनेक वेळा हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून देण्याची वेळ आली होती. त्याचबरोबर, या प्रकल्पाच्या पाण्यावर वीजनिर्मितीही सुरू करण्यात आली.

पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्यातही प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने, अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. परभणी शहरासह हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी येलदरी प्रकल्पावर आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागातील सुमारे अडीचशेपेक्षा अधिक पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर चालविल्या जातात.

उन्हाळ्यात दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, या वर्षी टंचाईची परिस्थिती उद्‌भवणार नाही, असे दिसते. ६८८ दलघमी एकूण पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला ५६४.२८७ दलघमी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याची टक्केवारी ६९.६८ टक्के एवढी आहे.

१ जूनपासून १ हजार मिमी पाऊस

येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १ जून, २०२० पासून आजपर्यंत १ हजार ५४ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणात १८८४.६३ दलघमी पाण्याची आवक झाली. धरण १०० टक्के भरल्याने या प्रकल्पाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे ६३८.८१ आणि मुख्य दरवाजाद्वारे १०२१.६९ दलघमी पाण्याचा विसर्ग आजपर्यंत झाला आहे.

Web Title: In the Yeldari project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.