खडकपूर्णाचे दरवाजे उघडल्याने येलदरी पाण्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:22 AM2021-09-05T04:22:26+5:302021-09-05T04:22:26+5:30
जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्प जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, सध्या या प्रकल्पामध्ये ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. पूर्णा नदीवरील ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्प जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, सध्या या प्रकल्पामध्ये ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. पूर्णा नदीवरील या प्रकल्पाच्या वरील बाजूस बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण असून या धरणात सध्या १४८.९८ दलघमी पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पातील जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ८७ टक्के असून या प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडून दररोज १०९२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जात आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून येलदरी प्रकल्पात हे पाणी दाखल होत असून या प्रकल्पाचा पाणीसाठाही वाढत आहे.
सद्य:स्थितीला येलदरी प्रकल्पामध्ये ७२३.६५४ दलघमी जिवंत पाणी साठा झाला आहे. त्याचप्रमाणे ८४८.३३१ दलघमी एकूण पाणीसाठा झाल्याची नोंद प्रकल्प प्रशासनाने घेतली आहे. मागील २४ तासात या प्रकल्पांमध्ये दहा दलघमी पाण्याची आवक झाली आहे. सद्य:स्थितीला प्रकल्प ९० टक्के भरला असून पाण्याची आवक वाढल्यास केव्हाही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढलेला आहे.
पाणलोट क्षेत्रात पाऊस
येलदरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दररोज पाऊस होत आहे. शनिवारीदेखील सायंकाळच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला होता. रात्रभर पाऊस झाल्यास या प्रकल्पातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होऊ शकते. या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी जलविद्युत केंद्राच्या माध्यमातून पूर्णा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे आगामी काळात वीजनिर्मिती होण्याची शक्यता आहे.