येलदरीचा जलविद्युत प्रकल्प झाला ५२ वर्षांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:27+5:302021-01-01T04:12:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणावर उभारण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्पाला १ जानेवारी रोजी ५२ वर्ष पूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणावर उभारण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्पाला १ जानेवारी रोजी ५२ वर्ष पूर्ण होत असून, या प्रकल्पातून आतापर्यंत शेकडो मेगावॅट विजेची निर्मिती झाली आहे. यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अखंडितपणे सुरू असलेल्या या प्रकल्पाचा शुक्रवारी वर्धापन दिन आहे.
देशाचे तत्कालिन गृह तथा वित्त मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे पूर्णा नदीवर धरण उभारण्यात आले. या धरणाच्या पाण्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. तसेच या तिन्ही जिल्ह्यांतील २३२हून अधिक गावे पिण्याचे पाणी येलदरीतून घेतात. याच येलदरी प्रकल्पावर १ जानेवारी १९६९ रोजी जलविद्युत प्रकल्पाची उभारणी झाली. येलदरी धरणात एकूण ९३४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा होतो. त्यापासून ५९ दशलक्ष युनिट इतक्या विजेची निर्मिती होते. हे धरण आतापर्यंत ३० ते ३५ वेळा भरले आहे. त्यातून जवळपास १८ हजार दशलक्ष घन युनिट विजेची निर्मिती झाली आहे. यावर्षी येलदरी धरणाच्या परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. सात वर्षांनंतर येलदरी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातच धरणातील पाणी नदीपात्रात सोडावे लागले. या अतिरिक्त पाण्यावर ७२ दिवस अखंडितपणे जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्यातून तब्बल १४ कोटी रुपयांहून अधिकचा महसूल वीज निर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या तिजोरीत जमा झाला. गेल्या ५२ वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या जलविद्युत प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तरीही उपलब्ध मनुष्यबळावर पूर्ण क्षमतेने विद्युत निर्मिती करण्याचे कसब येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवले आहे. या विभागाचे मुख्य अभियंता अभिजीत कुलकर्णी, नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली येलदरी विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एम. डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. के. रामदास, उपकार्यकारी अभियंता निशांत महाजन, येलदरी जलविद्युत केंद्राचे अभियंते, तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली आहे.
प्रकल्पात ३ विद्युत निर्मिती संच
येलदरी प्रकल्पातील जलविद्युत केंद्र येथे ७.५ मेगावॅट क्षमतेचे प्रत्येकी ३ विद्युत निर्मिती संच आहेत. या तीन संचांच्या माध्यमातून २२.५० मेगावॅट वीजनिर्मिती एकाचवेळी करण्याची या केंद्राची क्षमता आहे. येलदरी प्रकल्पातून २८ डिसेंबर रोजी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. त्यानुसार ३ पैकी २ संचांद्वारे सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून १५ मेगावॅट वीज तयार होणार आहे.