सायबर पोलीसाची नोकरी लावतो म्हणून युवकाची फसवणूक, युपीआयवरून घेतले पैसे
By राजन मगरुळकर | Published: August 22, 2023 05:53 PM2023-08-22T17:53:44+5:302023-08-22T17:54:25+5:30
बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात
परभणी : सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या नावाचा वापर करून सायबर पोलीस म्हणून नोकरीला लावतो असे म्हणत एका अठरा वर्षीय युवकाची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये सदरील युवकाकडून एक लाख ११ हजार १४० रुपये संबंधिताने फोन पेच्या माध्यमातून वेळोवेळी घेत फसवणूक केली. हा प्रकार तीन एप्रिल ते १३ जूनच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला.
जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव येथील मुंजा पांडुरंग कंठाळे या तरुणाने बोरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेतील युवकाची फसवणूक करणाऱ्या इसमाने सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या नावाचा वापर करून सायबर पोलीस म्हणून नोकरीला लावतो असे म्हणत संवाद साधला. यावर विश्वास बसल्याने ३ एप्रिल एप्रिल ते १३ जूनच्या दरम्यान वेळोवेळी फोन पे नंबर वरून एक लाख ११ हजार १४० रुपये घेत फसवणूक केली. नोकरी विषयी विचारणा केल्यावर संबंधिताने उडवा उडवीची उत्तरे दिली. याबाबत संशय आल्याने समोरील व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव रमेश भीमराव अडसुळे (रा.बार्शी, जि.सोलापूर) असे असल्याचे समजले. त्यानंतर याप्रकरणी बोरी ठाण्यात सोमवारी मुंजा कंठाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेतील आरोपीला बोरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यास २५ ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर तपास करीत आहेत.