मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन, सेलू तालुक्यातील घटना
By ज्ञानेश्वर भाले | Published: March 9, 2024 01:33 PM2024-03-09T13:33:32+5:302024-03-09T13:33:46+5:30
मृतदेहाजवळ आढळली सुसाइड नोट, मराठा आरक्षण न मिळाल्याने जीवन संपवत असल्याचे केले नमूद
सेलू (जि. परभणी) : सेलू तालुक्यातील नागठाणा येथे मराठा आरक्षण न मिळाल्याने राहत्या घरी ३३ वर्षीय युवकाने रूमालाच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. डिगांबर बाबुराव मोगल असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री पावणेबाराला सेलू ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दत्ता बाबुराव मोगल (रा.नागठाणा) यांनी ठाण्यात खबर दिली की, माझा भाऊ डिगांबर मोगल याने गुरूवारी पत्नी बाहेरगावी गेल्याने घरी कोणीही नसतांना घराच्या लोखंडी अँगलला रूमालाच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. संबंधित घटना शुक्रवारी सांयकाळी पाचला कळाली आहे. त्यानंतर पो.नि. दिपक बोरसे यांच्या आदेशाने पोलीस हवालदार शिवदास सुर्यवंशी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
या दरम्यान आत्महत्या केलेल्या डिगांबर मोगल याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण न मिळाल्याने आत्महत्या करीत आहे असे लिहिलेले होते. सेलू उपजिल्हा रुग्णालयात शेवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी सेलू ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.