कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात युवकांचा परभणी जिल्हा कचेरीला घेराव
By राजन मगरुळकर | Published: October 10, 2023 05:51 PM2023-10-10T17:51:54+5:302023-10-10T17:52:34+5:30
खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा : प्रशासनाला निवेदन
परभणी : शासनाने घेतलेल्या कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय आणि शाळांच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कंत्राटी नोकरभरती विरोधात तरुणांनी मोर्चात सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणि घेराव आंदोलन करण्यात आले. मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वारासमोर खा.जाधव यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय सारणीकर, अतुल सरोदे, पंढरीनाथ घुले, रावसाहेब रेंगे, झेलसिंग बावरी, सय्यद कादर, दीपक बारहाते, नितीन लोहट, रामप्रसाद रणेर, प्रदीप भालेराव, उदय देशमुख, शेख रफिक, काकडे, विकी पाष्टे, रामदेव ओझा यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी नोकर भरतीच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यानंतर शासनाच्या त्या शासन आदेशाची विद्यार्थ्यांनी होळी केली. सदरील मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
हक्काचे परत द्या, अन्यथा युवक जागा दाखवतील : खा. जाधव
शाळा खासगीकरण असो की, नोकर भरती प्रक्रियेत कंत्राटी भरती या सर्व निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या धोरणाचा निषेध केला आहे. ही तर आंदोलनाची सुरुवात आहे. अजून पुढे तीव्र स्वरूपाची आंदोलने केली जातील. कोणत्याही आंदोलनाची ठिणगी ही परभणीमध्ये पडते. आणि त्याचा वनवा मुंबईत, दिल्लीत, देशात पोहोचतो. युवकांचे, तसेच सर्वसामान्यांचे हक्काचे प्रश्न सोडवा अन्यथा हेच युवक केंद्र सरकार, राज्य सरकारला आगामी काळात जागा दाखवतील. तरुणांच्या भावना या सरकारने समजून घ्याव्यात, असे आवाहन खा.संजय जाधव यांनी मार्गदर्शनप्रसंगी केले.