बलसा गावात १२ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; जिल्हाधिऱ्यांच्या चर्चेनंतर बहिष्कार मागे
By राजन मगरुळकर | Published: April 26, 2024 12:20 PM2024-04-26T12:20:55+5:302024-04-26T12:21:46+5:30
गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्ह्यात सुरुवात झाली. मात्र, परभणी शहराजवळ खानापूरलगत असलेल्या बलसा खू. या पुनर्वसित गावामध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत एकही ग्रामस्थांनी मतदान केले नाही.
गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. हा प्रकार समजतात तत्काळ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे हे वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांसह गावामध्ये दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढून विविध प्रश्नाबाबत लेखी पत्र देऊन समस्या सोडविण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. मतदान हा मूलभूत हक्क असून तो आपण बजावावा असे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी सदरील आश्वासनानंतर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
या गावातील पाणी, वीज सोबतच मूलभूत समस्यांच्या प्रश्नावरही ग्रामस्थांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे साकडे घातले व समस्या मांडल्या. गावाच्या परिसरात होणारे वीज चोरी, विजेचे आकडे याबाबत सुद्धा प्रशासनाने पाऊल उचलावे अशी मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्यासह निवडणूक निरीक्षक, फिरते पथक आणि मतदान केंद्राचे विविध पथक गावामध्ये आले होते.
अखेर बहिष्कार मागे
ग्रामस्थांनी गावातील ग्रामपंचायत समोर उद्घोषणा करून मतदान बहिष्कार मागे घेतल्याचे आता जाहीर केले. त्यानंतर पहिला मतदार केंद्रावर दाखल झाला आहे. आता ग्रामस्थ येथून रवाना होऊन मतदान केंद्रावर मतदानासाठी येत आहेत.