विद्यार्थ्यांना बिस्कीट आणण्यासाठी पाठवून जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 04:20 PM2022-12-26T16:20:45+5:302022-12-26T16:23:08+5:30
गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील खळबळजनक घटना
सोनपेठ (परभणी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कार्यालयातच शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा जि.प. प्राथमिक शाळेत घडली. शाळेच्या कार्यालयातच शिक्षकाने गळफास घेतल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोनपेठ पोलीस करत आहेत.
गंगाखेड तालुक्यातील धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विठ्ठल रत्नपारखे ( 45, रा. गंगाखेड ) आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेत आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना रत्नपारखे यांनी बिस्कीट आणण्यासाठी गावातील किराणा दुकानावर पाठवले. त्यानंतर शाळेच्या कार्यालयातील छताला असलेल्या लोखंडी हुकला नायलॉनच्या पांढऱ्या पट्टीने गळफास घेतला.
दरम्यान, काही वेळाने अन्य शिक्षक आणि विद्यार्थी तेथे दाखल झाली. शिक्षकांनी याची माहिती ग्रामस्थांना दिली. धारासुर येथील सरपंच राजेभाऊ गवळे व गंगाधर (आबा ) कदम यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात सदर माहिती दिली. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक मंचकराव फड, पो.ना. प्रभाकर बाजगीर, पो.ना. मनोज राठोड, चालक गणेश नाटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी केंद्रप्रमुख विठ्ठलप्रसाद पवार, शिक्षक साहेबराव राठोड, गोविंद रोडे, सुशील थडवे यांच्या समक्ष पंचनामा करत विठ्ठल रत्नपारखे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह धारासुर ग्रामस्थांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.