जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:33+5:302020-12-25T04:14:33+5:30

परभणी : जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, उपाध्यक्ष अजय ...

Z.P. The President, Vice President and Speakers will have to work hard | जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा लागणार कस

जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा लागणार कस

googlenewsNext

परभणी : जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी आणि सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या गावात होणाऱ्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. ३० डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. या अनुषंगाने जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या सोनपेठ तालुक्यातील विटा या गावातही निवडणूक होत आहे. ९ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीवर विटेकर यांचेच स्थापनेपासून म्हणजेच १९५६ पासून वर्चस्व आहे. फक्त १९९५ ते ९८ या तीन वर्षात विरोधकांच्या हाती सत्ता होती. आता पुन्हा एकदा ही ग्रा.पं. ताब्यात ठेवण्याची तयारी माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी चालविली आहे. ही निवडणूक बिनविरोध होते की नाही? याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीला आले पक्षीय स्वरुप

आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पॅनलच्या माध्यमातून लढविण्यात येत होत्या. आता मात्र या निवडणुकांना पक्षीय स्वरुप आले आहे. त्यामुळे थेट पक्षाच्या माध्यमातूनच निवडणुका लढविण्याची तयारी काही नेते मंडळींनी चालविली आहे. त्यांना वरिष्ठ नेत्यांचे तसे मार्गदर्शन होत आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्व आले आहे.

कृषी सभापतींच्या गावात राष्ट्रवादीचे दोन गट

जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती मीराताई टेंगसे यांच्या रेणापूर या गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत. सद्यस्थितीत राष्ट्रवादीच्याच ताब्यात ही ग्रामपंचायत आहे. गेल्यावेळी येथील निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळी ही निवडणूक बिनविरोध होते की राष्ट्रवादीच्या दोन गटांत लढत होते याकडे लक्ष लागले आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा लागणार पणाला

ग्रामपंचायतीची निवडणूक होत असली तरी या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आदी पक्षातील प्रमुख नेत्यांसह अन्य काही पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची आहे.

घाटगे, आणेराव यांच्या गावांत २ वर्षानंतर निवडणूक

शिक्षण सभापती अंजलीताई गंगाप्रसाद आणेराव यांच्या बाभळी व महिला व बालकल्याण सभापती शोभाताई रामभाऊ घाटगे यांच्या साळापुरी या गावात दोन वर्षानंतर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

जि.प. उपाध्यक्ष चौधरी यांची कसोटी

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या बोरी या गावातही निवडणूक होत आहे. सद्यस्थितीत ग्रा.पं.वर त्यांची सत्ता आहे. जिंतूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या या गावातील निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची होते. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन प्रमुख पक्षांच्या पॅनलमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Web Title: Z.P. The President, Vice President and Speakers will have to work hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.