अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:33 PM2024-10-02T18:33:58+5:302024-10-02T18:35:16+5:30

पोलिसांच्या निर्भया पथकामुळे झाला उलगडा; या प्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल

ZP School of Manwat Teacher beating girl students without reason using obscene language; The girls read the complaint | अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला

अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला

- सत्यशील धबडगे 
मानवत:
आठवी वर्गातील विद्यार्थिनींना रोज अश्लील भाषेचा वापर करून शिक्षक विनाकारण मारहाण करत असल्याची संतापजनक घटना शहरातील जिल्हा परिषद शाळेत उघडकीस आली आहे. या प्रकरणी ४५ वर्षीय शिक्षक दत्ता गंगाधर होगे याच्या विरोधात मानवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे निर्भया पथक शाळेत तपासणीसाठी आले असता त्यांच्यासमोर विद्यार्थिनींनी मोकळा संवाद साधत शिक्षकाच्या तक्रारींचा पाढा वाचल्याने हा प्रकार सर्वांच्या समोर आला.

शहरातील मोंढा परिसरात गटशिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा परिषद प्रशाळा आहे. शाळेत निर्भया पथकातील पोलिस कर्मचारी भेट घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. मंगळवारी (ता.१ ) पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार पेटी उघडली असता त्यात, शिक्षक दत्ता गंगाधर होगे हा विद्यार्थिनींना अश्लील भाषेचा वापरून विनाकारण रोज छडीने मारहाण करीत असल्याच्या तक्रारीच्या सहा चिठ्या आढळून आल्या. याबाबत पडताळणी करण्यासाठी निर्भया पथकाने विद्यार्थिनींना भेटून विश्वासात घेत चर्चा केली. यात शिक्षक होगे हा मागील पंधरा दिवसांपासून विद्यार्थिनींना अश्लील भाषेचा वापर करून मारहाण करीत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मुख्याध्यापिका छाया गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्भया पथकाने बजावली महत्वपूर्ण भूमिका 
एक ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता निर्भया पथकाने महिला पोलीस कर्मचारी शकुंतला चांदीवाले आणि पोलीस हवालदार सय्यद फय्याज यांनी इयत्ता आठवीच्या वर्गाला भेट दिली असता विद्यार्थी विद्यार्थिनींनी तक्रार पेटी उघडण्याची  विनंती निर्भया पथकाला केली. उपस्थित शिक्षिका, शिपाई यांच्या समक्ष तक्रारपेटी उघडल्यानंतर त्यात शिक्षक दत्ता होगे याच्याविरुद्ध तक्रारीच्या अनेक चिठ्या आढळून आल्या. त्यानंतर आज पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि घोरपडे, महिला पोलीस कर्मचारी शकुंतला चांदीवाले आणि पोलीस हवालदार सय्यद फय्याज यांनी विद्यार्थिनीशी संवाद साधल्यानंतर शिक्षक दत्ता होगे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

होगे याची वादग्रस्त शिक्षक म्हणून ओळख  
पालकांशी अरेरावी करणे, सहकारी शिक्षकांना त्रास देणे, धमक्या देणे  या प्रकरणामुळे शिक्षण विभागात शिक्षक दत्ता होगे कायम चर्चेत आहे. यातच आता विद्यार्थिनींना दिलेल्या त्रासामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: ZP School of Manwat Teacher beating girl students without reason using obscene language; The girls read the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.