FORD नं भारतात गाड्यांचं उत्पादन बंद करण्याचा घेतला निर्णय; पाहा काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 17:42 IST
1 / 8अमेरिकेची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी फोर्ड (FORD) भारतीय बाजारपेठेत दीर्घ काळापासून संघर्ष करत आहे. कंपनीच्या वाहनांची विक्री देशात सातत्याने कमी होत आहे, या व्यतिरिक्त, कंपनीने बऱ्याच काळापासून आपल्या वाहन पोर्टफोलिओमध्ये कोणतेही नवीन मॉडेल समाविष्ट केले नाही.2 / 8दरम्यान, आता फोर्ड मोटर्सनं भारतात गाड्यांचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी भारतातील आपले दोन्ही उत्पादन प्रकल्पातील गाड्यांचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.3 / 8रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार फोर्ड मोटर्स कंपनीने भारतातील त्याच्या दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला गाड्यांच्या विक्रीमागे कोणताही नफा होत नसल्याचं कारण सांगण्यात येत आहे 4 / 8मात्र, फोर्ड मोटरकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्याची औपचारिक घोषणा लवकरच होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारतात नफा होण्याचे कोणतेही संकेत दिसत नसल्यानं कंपनीनं साणंद आणि मराईमलाई येथील उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.5 / 8याशिवाय कंपनी पुढील कालावधीत काही गाड्यांची आयात करून विक्री करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यमान ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी कंपनी डीलर्सनादेखील मदत करणार आहे. परंतु फोर्डनं यावर कोणतीही माहिती दिली नाही. जनरल मोटर्स आणि हार्ले डेविडसनसारख्या कंपन्यानंतर ही तिसरी अशी अमेरिकन कंपनी आहे जी भारतातून आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. 6 / 8फोर्डच्या गाड्यांच्या विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ती निराशाजनक आहे. गेल्या महिन्यात कंपनीनं देशभरात 1508 गाड्यांची विक्री केली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ती 4731 युनिट्स इतकी होती. 7 / 8या दरम्यान कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये 68.1 टक्क्यांची घट दिसून आली. याशिवाय प्रवासी वाहतूक सेगमेंटमध्ये कंपनीचा मार्केट शेअरदेखील गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या दोन टक्क्यांच्या तुलनेत आता 0.6 टक्के इतका राहिला आहे.8 / 8सध्या फोर्ड भारतीय बाजारात फिगो हॅचबॅक, एस्पायर सेडान कारसह एसयूव्ही सेगमेंटमध्ये इकोस्पोर्ट, एन्डेव्हर आणि फ्रीस्टाईल मॉडेल्सची विक्री करते. एंडेव्हर हे गेल्या महिन्यात कंपनीचं सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे आणि या काळात कंपनीने या एसयूव्हीच्या एकूण 928 युनिट्सची विक्री केली आहे, तर फोर्ड फिगो हे केवळ 7 युनिट्ससह सर्वात कमी विक्री झालेलं मॉडेल ठरलं आहे.