शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेनॉची ट्रायबर 'ट्राय' केली, सात सीटर म्हणून चांगला, खिशाला परवडणारा पर्याय आहे का?

By हेमंत बावकर | Published: December 05, 2023 2:17 PM

1 / 9
सध्या अनेकांना थोड्या मोठ्या, सात सीटर कारची गरज पडू लागली आहे. फॅमिली मोठी होतेय, लगेजही वाढतेय. यामुळे सामान्य ग्राहकांना खिशाला परवडणारी अशी परंतू थोडी मोठी कार हवीय. सात सीटर कारमध्ये खिशाला परवडणारे खूप कमी पर्याय आहेत. त्यापैकीच एक रेनॉची ट्रायबर ही आहे. ही कार आम्ही 556 किमी सर्व प्रकारच्या रोडवर चालवून पाहिली. खरेच ही कार मायलेजसाठी खिशाला परवडणारी आहे का? आरामदायी आहे का? पिकअप कसा आहे. चला पाहुया...
2 / 9
खरेतर ही सात सीटर कार आहे. परंतू, मागे मोठे व्यक्ती जास्त काळ बसू शकत नाहीत. तिथे लहान मुले, कमी उंचीचे दोन व्यक्ती आरामात बसू शकतात. यामुळे ही कार ज्यांच्या घरात चार वयस्क आणि दोन मुले किंवा तीन वयस्क तीन मुले अशा कॉम्बिनेशनच्या फॅमिलीसाठी योग्य वाटली.
3 / 9
आणखी एक विचार प्रॅक्टीकली करण्यासारखी गोष्ट म्हणजे पाच जणांच्या फॅमिलीसाठी देखील उपयुक्त आहे. मागच्या सीट फोल्ड केल्या की हवे तेवढे लगेज ठेवता येते. म्हणजे लाँग टूरवर जाण्यासाठी ही कार अगदी परवडणारी आहे.
4 / 9
प्रवासासाठी कार एकदम आरामदायक आहे. लेग स्पेस चांगली आहे. एक्सप्रेस हायवे, गावाकडचे रस्ते, खड्ड्यांचे रस्ते आदींमध्ये सस्पेंशन ठीकठाक वाटले. पाच ते सात जणांसाठी पाण्याच्या बॉटल पुरतील एवढी स्पेस दरवाजांमध्ये देण्यात आली आहे. पाठीमागच्या सीटवर जाण्यासाठी मधली सीट फोल्ड करावी लागते. एवढी कसरत या कारमध्ये तेवढी करावी लागते.
5 / 9
रात्रीच्यावेळी रस्त्यावर फेकली जाणारी हेडलाईट चांगली आहे. पहाटेच्या धुक्यातही चांगली व्हिजिबिलीटी मिळत होती. ब्रेकिंगही चांगले वाटले. एकंदरीत कार वळणांवर किंवा हायवेवर चांगला बॅलन्स ठेवणारी आहे. मोठाल्या स्पीडब्रेकरवर देखील कार खालून घासली नाही, ग्राऊंड क्लिअरंस चांगला देण्यात आला आहे.
6 / 9
एक्स्प्रेस हायवेवरील घाटात रात्रीच्यावेळी पूर्ण ट्रॅफिक होते. तिथे गाडीचा पिकअप चांगला वाटला. मॅन्युअल गिअरची ही कार होती. चढणीला थांबलेली कार उठविताना झगडावे लागले नाही. किंबहुना हाफ क्लच, एक्सीलेटर असा खूप वेळ द्रविडी प्राणायाम करावा लागला नाही. पहिल्या मॉडेलला हा त्रास अनेकांना होत होता. परंतू, बीएस६ मध्ये कंपनीने ही समस्या बहुतांश दूर केली आहे.
7 / 9
१.० लीटरचे इंजिन सात सीटर कारला देण्यात आले आहे. यामुळे पिकअपबद्दल जरा साशंकता होती. ७०-८० च्या स्पीडला असताना आणखी वेग घेण्यासाठी अॅक्सिलरेटर दाबला की पिकअप घेतेवेळी इंजिन झटका द्यायचे, असे वाटायचे की कार बंद झाली. परंतू, हा झटका नंतर नंतर सवयीचा झाला. परंतू, ड्रायव्हिंगवेळी कार देत असलेली ओव्हरटेकचा आत्मविश्वास कमी होत होता.
8 / 9
दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने एक्सप्रेस हायवेवरील घाट वगळता आम्हाला ट्रॅफिक मिळाले नाही. प्रवासाची वेळही तशी रात्री व सकाळी लवकरची होती. या ५५६ किमीच्या प्रवासात कारने साधारण ३३ लीटर पेट्रोल वापरले. म्हणजेच १६.८४ चे मायलेज मिळाले. जे आजच्या पाच सीटर कार एवढेच आहे.
9 / 9
एकंदरीत पाच ते सात जणांच्या कुटुंबासाठी ही प्रशस्त कार आहे. इंजिनचा झटका एक चिंतेचे कारण आहे. ते सोडले तर साऊंड सिस्टीम, इन्फोटेन्मेंट सिस्टीम ठीक वाटली. तुम्ही वाहतूक कोंडीत अडकलात किंवा सारखी कार २-३ गिअरवर चालवावी लागत असेल तर मायलेजमध्ये फरक पडेल. एकंदरीत कमी किंमतीची सात सीटर कार व फोर स्टार सेफ्टी रेटिंगची कार म्हणून हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
टॅग्स :Renaultरेनॉल्ट