शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA चा स्पर्धक कंपन्यांना मोठा ‘शॉक’! EV सेगमेंटमध्ये नंबर १; विक्रीत ४३९ टक्क्यांची दणदणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 11:25 AM

1 / 12
गेल्या काही महिन्यांपासून एकापेक्षा एक वाहने सादर करून TATA ग्रुपच्या Tata Motors ने भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. इतकेच नव्हे तर इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्येही स्वस्तात मस्त कार सादर करून या विभागात क्रमांक १ कायम राखला आहे.
2 / 12
सन २०२१ हे TATA ग्रुपसाठी अत्यंत चांगले तसेच दमदार ठरले. टाटा मोटर्सने केवळ भारतीय बाजारपेठेत नाही, तर शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ घातला. एकीकडे ग्राहकांच्या प्रचंड पसंतीस उतरून दुसरीकडे गुंतवणूकदारांनाही मालामाल केले.
3 / 12
गेल्या अनेक महिन्यांपासून TATA Motors कंपनीच्या कारची विक्री सातत्याने वाढताना दिसत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमीकंडक्टर चीपचे संकट असूनही टाटा मोटर्स कंपनी ग्राहकांची मागणी वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहे.
4 / 12
इलेक्ट्रिक सेगमेंटबाबत बोलायचे झाल्यास TATA ने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. डिसेंबर महिन्यात TATA ने एकूण ३५ हजार २९९ कारची विक्री केली. यापैकी २ हजार २५५ इलेक्ट्रिक कार आहेत. आताच्या घडीला टाटा मोटर्सच्या Tata Nexon EV आणि Tata Tigor EV या दोन कार इलेक्ट्रिक पर्यायात उपलब्ध आहेत.
5 / 12
Tata Nexon EV या इलेक्ट्रिक कारला सर्वाधिक मागणी असून, ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. टाटा नेक्सॉन ईव्हीच्या जबरदस्त कामगिरीनंतर टाटाने लगेचच Tata Tigor EV लॉंच करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टाटा टिगोर ईव्ही या कारच्या मागणीतही मोठी वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 12
TATA Motors ने डिसेंबर महिन्यात २२५५ इलेक्ट्रिक कारची विक्री केली. तर नोव्हेंबर महिन्यात टाटाने १७५१ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. गेल्या वर्षाची तुलना केली, तर याच कालावधीत म्हणजेच डिसेंबर २०२० मध्ये टाटा मोटर्सच्या केवळ ४१८ इलेक्ट्रिक कारची विक्री झाली होती. यामुळे टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ४३९ टक्क्यांची दणदणीत वाढ नोंदवली आहे.
7 / 12
TATA Motors ने ऑक्टोबर २०२१ या महिन्यात १५८६ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. तसेच गेल्या वर्षभरातील प्रत्येक महिन्यात जवळपास १८.५३ टक्के वाढ नोंदवल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे अल्पावधीतच लोकप्रिय झालेली Tata Punch ही कारही इलेक्ट्रिक स्वरुपात सादर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
8 / 12
दरम्यान, सन २०२१ हे वर्ष टाटा मोटर्ससाठी अतिशय उत्तम ठरले आहे. डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्सने दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ह्युंदाई कंपनीला मागे टाकले आहे. यानंतर टाटा मोटर्स आता विक्रीमध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये आली आहे.
9 / 12
देशातील दिग्गज कार कंपनी टाटा मोटर्सने डिसेंबर २०२१ मध्ये वार्षिक आधारावर ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात एकूण ३५ हजार २९९ प्रवासी गाड्यांची विक्री केली. डिसेंबर २०२० मध्ये कंपनीने एकूण २३ हजार ५४५ गाड्या विकल्या होत्या.
10 / 12
देशात कार विक्रीमध्ये मारुती सुझुकी इंडिया आताही पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, डिसेंबर महिन्यात मारुतीच्याही गाड्यांची विक्री कमी झाली आहे. तर दुसरीकडे टाटा मोटर्सच्या गाड्यांची मागणी वाढली. मारुतीने डिसेंबर २०२१ मध्ये एकूण १,५३,१४९ कारची विक्री केली. तर दुसरीकडे डिसेंबर २०२० मध्ये कंपनीच्या १,६०,२२६ गाड्यांची विक्री झाली होती.
11 / 12
दुसरीकडे, TATA ने इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. टाटाने ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे सांगत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड ही कंपनी स्थापन करत असल्याची घोषणा केली आहे. ही कंपनी टाटा मोटर्सच्याच अधिपत्याखाली असणार असून ईव्हींचे सर्वकाही ही कंपनी पाहणार आहे.
12 / 12
ही कंपनी स्थापन होताच टाटाने ४०० किमी रेंजची ईव्ही लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. टाटा मोटर्सची Tata Nexon EV ही देशातील सर्वाधिक खपाची इलेक्ट्रिक कार आहे. टाटा मोटर्स Nexon EV च्या अपडेटेड मॉडेलवर काम करत असून, ही कार नवीन नेक्सॉन २०२२ च्या मध्यावर लाँच केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन