शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२४ निर्णायक! राहु-गुरु दशेत राहुल गांधी काँग्रेसला दिशा दाखवत पंतप्रधान होऊ शकतील का? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 10:10 AM

1 / 12
देशातील सर्वांत जुना असलेला काँग्रेस पक्ष आताच्या घडीला अन्य पक्षांच्या तुलनेत तितकाच मागे पडत चाललेला पाहायला मिळत आहे. एकेकाळी देशावर हुकुमत गाजवलेल्या काँग्रेसची सत्ता आता अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच राज्यात शिल्लक राहिलेली आहे. अशात आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची धुरा कुणाला द्यायची, यावरून घमासान सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. (Rahul Gandhi Kundali)
2 / 12
गांधी घराण्याचा वारसा आणि काँग्रेस पक्षाची कमान खांद्यावर पेलणाऱ्या राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनही पक्षातून पसंती मिळताना दिसत आहे. विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हातात घेऊन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला तगडी फाइट द्यावी, असे अनेक काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे. मात्र, दुसरा जी-२३ गट यांची मते यापासून भिन्न आहेत.
3 / 12
यातच राहुल गांधी यांनी काँग्रेसचा अध्यक्ष होण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. पुढील काळात होऊ घातलेल्या विविध राज्यांतील विधानसभा आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक दृष्टिक्षेपात असताना काँग्रेसमध्ये पुन्हा एक नवा जोश भरून सक्षम आणि भक्कम विरोधी पक्ष बनवणाऱ्या पक्षाध्यक्षाची गरज काँग्रेसला आहे. राहुल गांधी यांच्या कुंडलीतील योग काय सांगतात? आगामी काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने राहुल गांधी यांच्यासाठी कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 12
गेल्या अनेक महिन्यांपासून कधी ट्विटर, तर कधी सभांच्या माध्यमांतून केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकार आणि भाजपसमोर सातत्याने टीका करत, मर्मावर बोट ठेवणारे विषय लावून धरत आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी नवी दिल्लीत झाला. त्यावेळी त्यांच्या कुंडलीत तूळ लग्न उदय होत होते. गुरु ग्रहही तूळ राशीमध्ये उदित होत होता.
5 / 12
राहुल गांधीच्या कुंडलीत लग्न आणि गुरु वर्गोत्तम आहेत. सातव्या स्थानी योगकारक शनी आहे आणि दशमात लग्न स्वामी शुक्र विराजमान आहे. कुंडलीतील या शुभमुळे राहुल गांधींना राजघराण्यासारखे परिपूर्ण आणि समृद्ध कुटुंब लाभले. दुसरीकडे, मात्र राहुल गांधी यांच्या कुंडलीत काही प्रतिकूल योगही आहे. त्यामुळे अधिक मेहनत करूनही अपेक्षित यश साध्य करता येत नाही, असे सांगितले जाते.
6 / 12
राहुल गांधींच्या कुंडलीत चंद्र केद्रुम योगात अडकला आहे. या योगामुळे बहुतांश वेळी बऱ्याच गोष्टींसाठी ते इतरांवर अवलंबून राहिलेले पाहायला मिळू शकतात. त्यांची दूरदृष्टी वापरण्यास असमर्थ असतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. बुद्धिमत्ता, परिपक्वता आणि निर्णयाचा ग्रह बुध त्यांच्या कुंडलीत ८ व्या स्थानी विराजमान आहे. इतकेच नाही तर बुध सूर्य आणि शनि यांच्यात अडकलेला आहे.
7 / 12
या ग्रहस्थितीमुळे राहुल गांधींना कधी कधी ठोस निर्णय घेण्यात अडचण येते आणि विरोधक त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरीने कोणत्याही निर्णयावर पोहोचावे तसेच आपल्या हितशत्रूंवरही बारीक लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
8 / 12
याशिवाय राहुल गांधी यांच्या कुंडलीत शनी दुर्बल राशीत आहे आणि वैवाहिक जीवनात सुखाचा कारक ग्रह शुक्र पाप ग्रहांमध्ये फसलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात घरातील सुखाचा अभाव असतो, असे म्हटले जात आहे.
9 / 12
राहुल गांधींच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती दर्शवते की, त्यांना देशाच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे. राहुल गांधी कुंडलीवरुन सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, डिसेंबर २०२१ ते मे २०२४ पर्यंत राहु महादशेत गुरुची अंतर्दशा सुरू आहे. जी प्रतिकूल असल्याचे सांगितले जात आहे.
10 / 12
या दशेमुळे ते अनिश्चित स्थितीत राहतील आणि अनेक वेळा चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचे नुकसान करतात. यामध्ये १५ ऑक्टोबरपासून सूर्य जेव्हा तूळ राशीत प्रवेश करेल आणि केतूसोबत जाईल तेव्हा त्यांच्या अडचणी आणखी वाढतील.
11 / 12
सन २०२४ मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हाही राहुल गांधींच्या कुंडलीत गुरु आणि राहुची दशा सुरूच असेल. त्यामुळे २०२४ मध्येही राहुल गांधी आणि काँग्रेसला सध्या तरी पक्षाला फारसा फायदा होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
12 / 12
दुसरीकडे नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू असून, यातून बाहेर पडत पक्षाला उभारी देऊन भाजपसमोर आव्हान उभे करण्यास यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा