शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अधिक मास: ‘ही’ ८ कामे करा, लाभ अन् पुण्य कमवा; मिळतील पुरुषोत्तमाचे शुभाशिर्वाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 3:13 PM

1 / 15
अधिक महिना सुरु झाला आहे. याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या काळात पुरुषोत्तमचे पूजन, नामस्मरण अतिशय शुभ मानले गेले आहे. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सन २०२० मध्ये अश्विन महिना अधिक आला होता. आता सन २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे.
2 / 15
खगोलीय गणना आणि पंचांगानुसार, दर अडीच ते तीन वर्षांनी अधिक महिना येतो. एक सौर वर्ष ३६५ दिवसांचे असते. तर, एक चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये, याकरिता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच 'अधिक' घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतली जातात.
3 / 15
अधिक महिन्यातील नामस्मरण, उपासना, आराधना, जप यांच्या माध्यमातून कुंडलीतील अनेक दोषांचे निवारण करू शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अधिक महिन्यात करण्यात येणारी पूजा, पठण यांचे पुण्य नियमित काळात केलेल्या पूजन, अर्चनेपेक्षा १० पट अधिक मिळते, असे सांगितले जाते. भाग्याची भक्कम साथ प्राप्त करायची असेल, तर अधिक महिन्यात काही कामे करणे अत्यंत शुभ आणि उपयुक्त मानले जाते.
4 / 15
अधिक महिना हा श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. अधिक महिना असली, तरी दैनंदिन पूजाविधींमध्ये कोणताही बदल करू नये. मात्र, देवतांची अधिक कृपा प्राप्त व्हावी, यासाठी अतिरिक्त साधना, उपासना, आराधना, नामस्मरण, जप करण्यावर भर द्यावा, असे सांगितले जाते.
5 / 15
शक्य असल्यास अधिक महिन्यात नियमितपणे श्रीविष्णूंना गोडाचा नैवेद्य दाखवावा. अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूंना खीरीचा नैवेद्य दाखवावा. यासाठी तुळशीच्या पानांचा प्रामुख्याने वापर करावा, असे सांगितले जाते.
6 / 15
पिवळा रंग हा श्रीविष्णूंशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पिवळ्या रंगांची वस्त्रे, पिवळ्या रंगाचे धान्य, पिवळ्या रंगाची फळे आणि पिवळ्या रंगांचा समावेश असलेल्या गोष्टी सर्वप्रथम श्रीविष्णूंना अर्पण कराव्यात आणि त्यानंतर यथाशक्ती सदर वस्तूंचे दान करावे. दान करणे शक्य नसल्यास जवळच्या मंदिरात नेऊन द्याव्यात, असे सांगितले जाते.
7 / 15
तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा दररोज लावावा. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास तुळशीभोवती ११ प्रदक्षिणा काढाव्यात. श्रीविष्णूंना तुळस सर्वाधिक प्रिय असल्याचे मानले जाते. असे केल्याने घरात सुख, शांतता, समाधान नांदते. सकारात्मकतेचा संचार होतो, असे सांगितले जाते.
8 / 15
अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे शक्य असल्यास दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी नित्य कर्मे आटोपल्यानंतर श्रीविष्णूंना केशरयुक्त दुधाचा अभिषेक करावा. यावेळी तुलसीपत्र आवर्जुन वाहावे. अभिषेक, पूजनानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करावा, असे सांगितले जाते.
9 / 15
भारतीय संस्कृती परंपरांमध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. पिंपळ वृक्षात श्रीविष्णूंचा वास असतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडाला शक्य असल्यास दररोज जलार्पण करावे. तसेच गायीच्या तुपाचा दिवा दाखवावा. असे केल्यास श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होता, असे म्हटले जाते.
10 / 15
अधिक मासात शक्य असल्यास दररोज दक्षिणावर्ती शंखाचे पूजन करावे. असे केल्याने श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवी या दोघांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच दररोज सकाळी सूर्यदेवालाही अर्घ्य द्यावे. यावेळी श्रीविष्णूंचे स्मरण करावे. असे केल्यास आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते
11 / 15
नोकरदार वर्गाला नोकरीत बढती, पदोन्नती आणि व्यापारी वर्गाना व्यापार गतिमान होण्यासाठी अधिक महिन्यातील नवमी तिथीला कुमारिकांना घरी बोलावून भोजन करवावे, असे सांगितले जाते.
12 / 15
अधिक महिना व्रत-वैकल्ये, उपास, दान, पूजा, यज्ञ, हवन आणि ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. या कालावधीत केलेल्या आराधना, उपासना, नामस्मरण, जप यांमुळे पापकर्मांचा क्षय होऊन पुण्यप्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. या कालावधीत दान केलेला एका रुपायाचे पुण्यफळ दसपटीने मिळते, अशी मान्यता आहे.
13 / 15
पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्ण कथा, श्री भागवत कथा, श्रीराम कथा, विष्णू सहस्रनाम, पुरुषसुक्त, श्री सुक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप, तीर्थस्थळी जाऊन स्नान आदी कार्ये केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.
14 / 15
याशिवाय, दीपदान, वस्त्र तसेच भागवत कथा ग्रथांचे दान अधिक महिन्यात अधिक पुण्य फलदायी मानले गेले आहे. असे केल्याने धन, वैभव, धान्य वृद्धिंगत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
15 / 15
सन २०२३ मध्ये मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. याआधी २००४ या वर्षी म्हणजे १९ वर्षांपूर्वी श्रावण हा अधिक महिना आलेला होता. पुढे २०४२ साली परत श्रावण हा अधिक महिना येईल.
टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाReligious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक