शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Akshaya Tritiya 2022: ५० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग! जाणून घ्या, व्रताचरण पद्धत, महत्त्व आणि मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 2:11 PM

1 / 12
वैशाख महिन्याची तृतीया अक्षय्य तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे अक्षय्य तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे. एखद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. कारण या तिथीला सुरू झालेले काम किंवा केलेले काम अक्षय्य राहते, अशी मान्यता आहे. (Akshaya Tritiya 2022)
2 / 12
कारागीर या दिवशी शेतीच्या कामाची हत्यारे करावयाला प्रारंभ करतात. शेतकरी वर्ग या दिवसाला विशेष महत्त्व देतो. चैत्रात बसवलेल्या गौरींचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात. यंदाच्या अक्षय्य तृतीयेला तब्बल ५० वर्षांनी दुर्मिळ योग जुळून येत आहे, जाणून घेऊया... (Amazing Rare Yoga on Akshaya Tritiya 2022)
3 / 12
अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते, अशा मान्यता आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही. म्हणून ही तिथी अक्षय्य मानली गेली आहे. देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते. (Akshaya Tritiya 2022 Significance)
4 / 12
जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते. सन २०२२ मध्ये ०३ मे रोजी अक्षय्य तृतीया असून, रोहिणी नक्षत्र ३ मे रोजी सकाळी १२. ३४ ते ४ मे रोजी पहाटे ०३:१८ पर्यंत आहे. (kshaya Tritiya 2022 Vrat Puja Vidhi)
5 / 12
अक्षय्य तृतीया दिनी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, अशी मान्यता आहे. नेहमीप्रमाणे प्रातःविधी उरकल्यानंतर पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची प्रतिके ठेवावीत. दोन्ही देवतांचे आवाहन करावे.
6 / 12
पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद-कुंकू वाहावे. उपलब्ध फुले अर्पण करावीत. तुळशीची पाने वाहावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी. यथाशक्ती दान करावे. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते, अशा मान्यता आहे.
7 / 12
सन २०२२ मध्ये रोहिणी नक्षत्र आणि शोभन योगादरम्यान अक्षय्य तृतीया साजरी होईल. मंगळवार आणि रोहिणी नक्षत्रामुळे या दिवशी मंगल रोहिणी योग तयार होणार आहे. यासोबतच या दिवशी दोन प्रमुख ग्रह स्वराशीत असतील आणि २ प्रमुख ग्रह उच्च राशीत विराजमान असणार आहेत.
8 / 12
तब्बल ५० वर्षांनी ग्रहांचा हा दुर्मिळ विशेष योग तयार होत असल्याचे मानले जाते. या दिवशी चंद्र वृषभ राशीत असेल आणि शुक्र मीन राशीत असेल. दुसरीकडे, शनी स्वस्वामित्व असलेल्या कुंभ राशीत असेल आणि गुरुही स्वराशी असलेल्या मीन राशीत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा अनुकूल स्थितीत चार मोठे ग्रह असणे हा दुर्मिळ योग मानला जातो.
9 / 12
अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे होय. सौर ऊर्जा म्हणजेच सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय्य मानली गेली आहे. त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय्य मानली गेली आहेत.
10 / 12
पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षवधी वर्षे लोटली. मात्र, या अक्षय्य गोष्टी आजही अस्तित्वात असून, जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत या गोष्टी कायम असतील, असे सांगितले जाते. अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते.
11 / 12
वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. तसेच या दिवशी उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. अक्षय्य तृतीयेला केलेल्या दानाला मोठे महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे.
12 / 12
अक्षय्य तृतीयेस दान करावे असा जो संकेत आणि परंपरा आपल्याकडे पाळली जाते आणि या दिवशी केलेल्या दानाचे महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणांतरी वर्णिल्या आहेत, त्या माणसाच्या मनात दान करण्याची, त्यागाची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितल्या आहेत. या सणाच्या निमित्ताने दानाचे आणि त्यागाचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनी केलेला आढळतो.
टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाAstrologyफलज्योतिषReligious programmeधार्मिक कार्यक्रम