शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्न करताय? त्याआधी 'या' पाच गोष्टींचा अवश्य विचार करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 12:22 PM

1 / 5
लग्नानंतर प्रत्येकाला हौस असते, जोडीदाराला मिरवण्याची. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी निवडताना त्यांच्या दिसण्यावर भर दिला जातो. परंतु लक्षात घ्या. सौंदर्य आज आहे उद्या नाही. वाढत्या वयानुसार शारीरिक बदल होतात आणि रंगरूप बदलू लागते. म्हणून रूपापेक्षा गुणांना महत्त्व द्या. समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेण्यासाठी सक्षम आहे का? ती तुमच्या सुख दु:खात सहभागी होऊ शकणार आहे का? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे पाठीशी उभी राहू शकणार आहे का? जर उत्तर हो असेल, तर असा जोडीदार अवश्य निवडा. अन्यथा दोन व्यक्ती एकत्र येऊनही एकमेकांना समजून घेत नसतील, तर त्यांच्या लग्नाला काहीच अर्थ उरत नाही.
2 / 5
दोन कुटुंबात वाढलेल्या दोन व्यक्ती विवाह संस्थेमुळे एकत्र येतात, परंतु आपलेच म्हणणे खरे करण्याच्या नादात अहंकाराला खतपाणी घालतात. वाद घालतात आणि टोकाच्या भूमिका घेत नाते संपवतात. म्हणून जोडीदार निवडताना समोरच्याची ऐकून घेण्याची क्षमता दोघांच्या ठायी असणे गरजेचे आहे. मी म्हणेन ती पूर्व, हा ताठर बाणा नात्यात दरी निर्माण करतो. समोरच्याची भूमिका, परिस्थिती, भावना, विचार लक्षात घेऊन आपली चूक असेल तर मान्य करण्याची तयारी दोघांनी दर्शवली पाहिजे.
3 / 5
लक्षात घ्या, जगात परिपूर्ण कोणीच नाही. तसे असते, तर देवाने मोराला कोकीळकंठी आवाज दिला असता, गरुडभरारीची क्षमता दिली असती, वाघ-सिंहासारखे शिकारीचे कौशल्य दिले असते. परंतु, त्याने तसे केले नाही! अपूर्णतेत परिपूर्णतेचा आनंद दडलेला आहे. तो आनंद आपण शोधायचा असतो. सगळेच परिपूर्ण झाले असते, तर कोणीही कोणाला विचारले नसते. म्हणून जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता, दोघांनी एकमेकांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारले पाहिजे. ती तयारी असेल, तरच नात्यात पुढे जा.
4 / 5
शारीरिक आकर्षणाला भुलून अनेक जण लग्नाचा निर्णय घेतात. परंतु हे आकर्षण फार काळ टिकत नाही. यासाठी आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर आपले भावनिक संबंध कसे आहेत, ते तपासून घ्या. तुमचा जोडीदार भावनिक गोष्टींवर सहज हितगुज करत असेल, तर भावनिक बंध आपोआप जोडले जातात. हे बंध आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आनंद देतात. एकत्र फिरायला जाणे, गाणे ऐकणे, मंदिरात जाणे किंवा बसून नुसत्या गप्पा मारणे, या छोट्या गोष्टीदेखील मोठा आनंद मिळवून देतात.
5 / 5
लोक कुंडली पाहून आयुष्यभराचा निर्णय घेतात. कुंडली हा मार्गदर्शन करणारा आयुष्याचा आरसा आहे. त्यात भविष्याचे तडाखे बांधलेले असतात. परंतु त्यापलिकडे आपण कसे वागतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. म्हणून ३६ पैकी २६ गुण जुळले म्हणून विवाह टिकत नाही, तर एकमेकांची मने परस्परांशी किती जुळलेली आहेत, दोघांकडून मन जपण्याचा किती प्रयत्न केला जात आहे, यावर नाते अवलंबून असते. म्हणून जोडीदाराकडून अपेक्षा करताना आपणही त्याला समजून घेत आहोत का, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.