शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ashadha Amavasya 2021: दीप अमावास्या: देवासमोर लावलेला दिवा विझला तर अशुभ मानले जाते का? पाहा, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 8:07 AM

1 / 13
चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येकडे पाहिले जाते. आषाढ एकादशीपासून सात्विकतेचा काळ मानला जाणारा चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मासातील पहिल्या आषाढ महिन्यातील शेवटची तिथी म्हणजे आषाढ अमावास्या. (Ashadha Amavasya 2021)
2 / 13
कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो. अगदी प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला ‘दीपपूजन’ केले जाते. (significance of lighting lamp)
3 / 13
सन २०२१ मध्ये शनिवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी आषाढ अमावास्या सुरू होईल आणि रविवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी संपेल. आषाढ अमावास्येला केले जाणारे दीपपूजन रविवार, ८ ऑगस्ट रोजी करावे, असे सांगितले जात आहे. (Ashadha Deep Amavasya 2021 Dates)
4 / 13
भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते.
5 / 13
आधुनिक काळात दिव्यांचे अनेक प्रकार आपण पाहतो. घरतील ट्यूबलाइटपासून ते मोबाइलमधील फ्लॅशलाइटपर्यंत नानाविध दिवे दररोज प्रकाशमान होत असतात. मात्र, पणती, निरांजन, समई या ज्योतिर्मयस्वरुप दिव्यांचे महत्त्व अबाधित आहे. कारण, एका ज्योतिने दुसरी ज्योत पेटवता येते. मात्र, ही ताकद आधुनिक लाइट्समध्ये नाही. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते.
6 / 13
दिवा हा अप्रत्यक्षरित्या आश्वस्त करत असतो. आपल्यातील आशावाद कायम ठेवण्यास मदत करत असतो. त्यामुळे दीप प्रज्वलित करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले गेले आहे. दिव्याचा प्रकाश परब्रह्म व नारायण स्वरुप मानला गेला आहे. (importance of lighting lamp)
7 / 13
कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. पूजा झाल्यानंतरही देवाला धूप, दीप अर्पण केले जाते. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो. मात्र, तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते, असे सांगितले जाते. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे.
8 / 13
शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. प्रदूषण दूर होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो, असे मानले जाते.
9 / 13
दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर, तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल, तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा, असे सांगितले जाते.
10 / 13
ऋग्वेदात दिव्याला अमृतासमान महत्त्व देण्यात आले आहे. देवरुप प्रकाशातून अंधकाराचा नाश करण्याची प्रेरणा आम्हाला मिळो, जीवन सुखी होवो, असे आवाहन अग्नी देवतेला करण्यात येते. दररोज घरात दिवा लावणे शुभ फलदायी असते, असे सांगितले जाते. (benefits of lighting lamp)
11 / 13
देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्ज्वलित करावा. (benefits of lamp in front of god)
12 / 13
मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते. वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कायम राहावी, यासाठी तिन्हीसांजेला दिवे लावण्याची परंपरा आपल्याकडे सुरू आहे. प्राचीन काळात ऋषि-मुनी आणि सामान्य नागरिकही सायंकाळी एका ठराविक वेळी दीप प्रज्ज्वलन करीत असत.
13 / 13
आजच्या काळातही कोट्यवधी घरात दिवेलागणीवेळी देवासमोर, तुळशीसमोर आणि घरातील प्रवेशद्वाराजवळ दिवा लावला जातो. काही घरांमध्ये कापूर, जटामांसी, लोबान यांचे मिश्रण करून धूपही घातला जातो. धूपामुळे घरातील विषाणू नष्ट होतात आणि घरात सकारात्मकता येते. घरातील प्रत्येक खोलीत धूप फिरवल्याने संपूर्ण घर शुद्ध होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल