शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Dhanu Sankranti 2021: सूर्याचा धनु राशीत प्रवेश: सामान्यांना दिलासादायक काळ; महागाई, कोरोनाचा प्रभाव ओसरण्याची चिन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 12:45 PM

1 / 12
डिसेंबर महिना धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. डिसेंबरमध्ये शुभ मार्गशीर्ष महिना सुरू असून, नवग्रहांचा राजा सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करत आहे. (Dhanu Sankranti 2021)
2 / 12
सूर्याच्या या धनु राशीतील प्रवेशाला अधिक महत्त्व असल्याचे ज्योतिषास्त्रात सांगितले जाते. या कालावधीला खरमास म्हटले जाते. तसेच सूर्याच्या या राशी संक्रमणाला धनु संक्रांती असेही म्हटले जाते. सूर्य आणि गुरु हे दोन्ही ग्रह मित्र ग्रह मानले जातात. (sun transit in sagittarius 2021)
3 / 12
वर्तमानातील सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सूर्याचे १६ डिसेंबर २०२१ रोजी धनु राशीत होत असलेला राशीबदल महत्त्वाचा मानला जात आहे. मेदिनी ज्योतिषानुसार, सूर्याच्या राशी संक्रमणाचा देश आणि जगावर कसा प्रभाव पडेल, याचा अभ्यास केला जातो.
4 / 12
आंशिक चंद्रग्रहणानंतर कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची चिंता वाढण्याचे संकेत देण्यात आले होते. ब्रिटनमध्ये झालेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पहिल्या मृत्युमुळे जगाची चिंता वाढणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत. मात्र, भारतात याचा फारसा प्रभाव दिसणार नाही, असा अंदाज ज्योतिषानुसार व्यक्त करण्यात आला आहे.
5 / 12
भारतात कोरोनाचे आकडे वाढलेले दिसले, तरी देशातील परिस्थिती नियंत्रणात राहील, असे म्हटले जात आहे. सूर्याच्या धनु राशीतील प्रवेशाचा भारताच्या कुंडलीवरील प्रभाव काहीसा दिलासादायक असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 12
तसेच धनु संक्रांतीवेळी शिव योग नामक शुभ योग जुळून येत आहे. सूर्य धनु राशीत प्रवेश करताना तूळ लग्न होत आहेत. एकूणच ग्रहमान आणि योग पाहता काही मोठी रहस्ये उघड होण्याची शक्यता असून, सरकारची धोरणे, नीती यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
7 / 12
संक्रांतीच्या कुंडलीत लग्नस्थानी पडत असलेल्या गुरु आणि चंद्र यांच्या शुभ दृष्टीचा प्रभाव सकारात्मक राहील, असे सांगितले जात आहे. खत, बियाणे, युरिया यांच्या किमती काही प्रमाणात कमी होऊ शकतील, याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे संकेत आहेत. मात्र, दुसरीकडे राहु, केतु आणि मंगळाच्या प्रभावामुळे सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
8 / 12
या कालावधीत सूर्य आणि बुध अतिशय जवळ अंशांवर असल्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणावर वाढेल. शीतलहरीमुळे उत्तर आणि मध्य भारतात मोठी बर्फवृष्टी होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय धनु संक्रांतीच्या कुंडलीत चंद्र सप्तम स्थानी शुभ स्थितीत असून, शुक्र आणि शनीची दहाव्या स्थानावर दृष्टी पडत आहे.
9 / 12
या एकूण ज्योतिषीय स्थिती आणि ग्रहमानाचा राजकीय पटलावर मोठा परिणाम पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. संपुष्टात आलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाजपला मोठा फायदा होऊ शकेल. यामुळे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील सत्ताधीश भाजपला विरोधकांना टक्कर देण्यात मदत मिळू शकेल.
10 / 12
सूर्याच्या संक्रमण कालावधीत मंगळ आपले स्वामित्व असलेल्या वृश्चिक राशीत विराजमान आहे. यामुळे वृश्चिक राशीचा प्रभाव असलेली भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील प्रचाराला चांगली गती आणि प्रगती लाभू शकेल.
11 / 12
तसेच मेदिनी ज्योतिषानुसार, खरमास किंवा धनु संक्रांतीच्या कालावधीत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.
12 / 12
एकूणच सूर्य ग्रहणानंतर होत असलेले सूर्याचे राशी संक्रमण म्हणजेच खरमास-धनु संक्रांतीचा काळ हा सामाजिक, राजकीय आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा ठरू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषInflationमहागाईcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन