शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2021: दिवाळीत लक्ष्मी देवीचे कृपाशिर्वाद हवेत? राशीनुसार ‘असे’ करा पूजन; होईल बरकत, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 12:09 PM

1 / 13
दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व असते, ते अश्विन अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळी केल्या जाणाऱ्या लक्ष्मी पूजनाला. महालक्ष्मी पूजनासह गणपती बाप्पा आणि कुबेराचीही पूजा केली जाते. मात्र, लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त करावयाची असल्यास राशीनुसार लक्ष्मी देवीचे पूजन करावे, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, आपण आपल्या राशीनुसार लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आपल्याला त्याचा विशेष लाभ मिळू शकतो. यासाठी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया...
2 / 13
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी दिवाळीत लक्ष्मी देवीचे कृपाशिर्वाद लाभावे, यासाठी लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. तसेच कर्जातून मुक्ती मिळवायची असल्यास मंगल स्तोत्राचे पठण केल्यास फायदा होईल, असे सांगितले जाते.
3 / 13
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी दिवाळीत लक्ष्मीपूजेवेळी आरतीनंतर 'ओम महालक्ष्म्यै नमः' मंत्राचा यशाशक्ती जप करावा. लक्ष्मीपूजनानंतर सलग ११ दिवस महालक्ष्मी देवीच्या या मंत्राचा जप केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, असे म्हटले जात आहे.
4 / 13
बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीच्या व्यक्तींनी दिवाळीत गणेशाची पूजा आणि लक्ष्मी-गणेश महायंत्राची पूजा करून ते धारण केल्यास किंवा आपल्या कार्यालयातील तिजोरीत ठेवल्यास जीवनातील आर्थिक अडचणी, समस्या दूर व्हायला मदत होईल, असे सांगितले जाते.
5 / 13
कर्क राशीचा स्वामी चंद्र असून, या राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी देवीला कमळ पुष्प अर्पण करावे. कमळ पुष्प मिळाले नाहीतर लाल रंगाचे कोणतेही फूल वाहावे. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते.
6 / 13
सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तींनी दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची नवीन मूर्ती घरी आणावी आणि घरातील देव्हाऱ्यात स्थापन करावी. असे केल्याने लक्ष्मी देवीसह गणपती बाप्पाचे शुभाशिर्वाद प्राप्त होतील, असे सांगितले जात आहे.
7 / 13
कन्या राशीचा स्वामी बुध असून, या राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करावी. एखादा नवीन व्यवसाय, उद्योग, व्यापार सुरू करण्यासाठी उत्तम दिवस ठरू शकेल. तसेच चंद्राच्या भ्रमणामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
8 / 13
शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केल्यास लाभ मिळू शकेल. तसेच लक्ष्मी देवीला गुलाबी रंगाचे फूल वाहावे, आर्थिक आघाडी मजबूत होऊन वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
9 / 13
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून, या राशीच्या व्यक्तींनी हातात कमळ पुष्प घेतलेल्या लक्ष्मी देवीची स्थापना करून मनोभावे पूजा करावी. असे केल्याने शुभ फळांची प्राप्ती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.
10 / 13
धनु राशीचा स्वामी गुरु आहे. धनु राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवीला अत्तर, सुगंधी द्रव्य अर्पण करावे. असे केल्याने दाम्पत्य जीवनातील गैरसमज, समस्या, अडचणी दूर होऊ शकतील. आर्थिक आघाडीवर सुधारणा होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
11 / 13
शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनावेळी देवीला तुपाचा दिवा दाखवावा. तसेच शनि यंत्राला अभिमंत्रित करून पूजास्थानी ठेवावे. असे केल्याने लक्ष्मी देवीसह शनीची कृपाही आपल्यावर राहू शकेल, असे म्हटले जात आहे.
12 / 13
कुंभ राशीचा स्वामीही शनी आहे. या राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनावेळी लक्ष्मी देवीचे प्रतिकृती असलेले चांदीचे नाणे पूजास्थळी ठेवावे. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकेल. तसेच अडकलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. धनलाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
13 / 13
गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीच्या व्यक्तींनी लक्ष्मी पूजनावेळी लक्ष्मी मातेच्या दोन्ही हातांशी गज म्हणजेच हत्ती असलेली प्रतिमा स्थापन करावी. तसेच लक्ष्मी देवीला गुलाबाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने यश, प्रगतीचे मार्ग साध्य होऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य