Dussehra 2024: If we can overcome 'these' five things, it's a real victory!
Dussehra 2024: 'या' पाच गोष्टींचे आपल्याला सीमोल्लंघन करता आले तर खरा विजयोत्सव! By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:58 AM1 / 6दुसऱ्यांशी केलेली स्पर्धा न संपणारी असते आणि असमाधानाकडे नेणारी असते, मात्र जेव्हा आपणच आपल्यासाठी आखून घेतलेल्या कक्षा विस्तारतो, तेव्हा आपसुख सीमोल्लंघन होते. आपल्यालाही अशाच पाच सीमा ओलांडायच्या आहेत.. कोणत्या ते जाणून घेऊ!2 / 6अभ्यासोनि प्रगटावे अशी समर्थ रामदास स्वामींनी घातलेली शिकवण आहे. म्हणजेच विषय कोणताही असो, त्याबाबतीत आपलं मत मांडताना त्या विषयाबद्दल आपल्याकडे ज्ञान असेल तरच विषयाला हात घाला अन्यथा तो विषय पूर्णपणे समजून घ्या मगच व्यक्त व्हा! अर्धवट ज्ञानापेक्षा अज्ञान कधीही चांगलं! कोऱ्या पाटीवर लिहिणं सोपं जातं. त्यामुळे अज्ञानाची सीमा ओलांडायची असेल तर अचूक मार्गाने ज्ञान प्राप्ती करणं हाच त्यावरचा उपाय आहे.3 / 6आपण पूर्ण ऐकून घेण्याआधी बोलण्याची घाई करतो आणि पचतावतो. आयुष्यात तोंडघशी पडण्याचे प्रसंग टाळायचे असतील तर अविचाराने बोलणं आणि अविचाराने केलेली कृती टाळा. बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही, असं आपल्याला शिकवलं जातं. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात आपण हा नियम पाळत नाही. दसऱ्याच्या निमित्ताने स्वतःवर बंधन घालून घेऊया आणि अविचाराने केलेली कृती आणि वक्तव्य टाळूया.4 / 6'सिर सलामत तो पगडी पचास' हा मुहावरा तुम्ही ऐकला असेल. अर्थात आरोग्य सुदृढ असेल तर आयुष्यात इतर कोणताही आनंद घेता येतो. त्यामुळे अनारोग्य टाळायचे असेल तर निरोगी आरोग्याचा ध्यास घ्यायला हवा. त्यासाठी लागणारी पथ्य, पाणी, व्यायाम याची बंधनं स्वतःवर घालून घ्यायला हवीत. अन्यथा साखर कारखान्याचा मालक असून मधुमेही असण्यासारखं दुःख आयुष्य भर झेलावं लागेल. अनारोग्याचं सीमोल्लंघन करूया सशक्त भारत घडवूया.5 / 6आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे, हा सुविचार बालपणी वहीत कित्येकदा लिहिला असेल पण तो आचरणात आणायला आपण विसरलो. आळस झटकून जो उभा राहतो तोच पुढे जातो. त्यामुळे यशस्वी होण्याची पहिली पायरी काही असेल तर ती म्हणजे आळस झटकून कामाला लागणे. आळस आपल्याबरोबर दारिद्रय, आजार, नैराश्य, कलह घेऊन येतो. त्यामुळे त्याचं सीमोल्लंघन आधी झालंच पाहिजे.6 / 6भगवान श्रीकृष्ण जेव्हा कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस सांगतात, तेव्हा त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ असा असतो की हाती घेतलेलं किंवा तुम्हाला नेमून दिलेलं कोणतंही छोटं मोठं काम प्रामाणिकपणे आणि मन लावून करा. लोक आपोआप दखल घेतील. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या प्रयत्नाचे दोनशे टक्के त्यात ओतले पाहिजेत. पाटी टाकणं बंद करा आणि प्रत्येक गोष्ट आस्थेने करा. तुम्हाला तुमचं समाधान नक्की मिळेल. आस्था अर्थात विश्वास फार महत्त्वाचा असतो. अविश्वास आणि शंका मनात ठेवून केलेली कोणतीही गोष्ट कधीही यशस्वी होत नाही, त्यामुळे आस्था बाळगा आणि प्रामाणिक राहा. आणखी वाचा Subscribe to Notifications