शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

February born astro: प्रेमळ, भावुक, संवेदनशील आणि ध्येयासक्त असतात फेब्रुवारीत जन्मलेले लोक; जाणून घ्या इतर गुण-दोष!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 2:00 PM

1 / 6
हलकी गुलाबी थंडी, थोडेसे उबदार ऊन, वसंताच्या आगमनाची नांदी आणि अशातच फेब्रुवारी महिन्यात झालेला तुमचा जन्म, तुमच्या ठायी असलेल्या रसिकतेला पोषक ठरतो. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीनुसार हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो म्हणून की काय, पण फेब्रुवारीत जन्माला आलेले लोक अतिशय प्रेमळ, भावूक आणि संवेदनशील असतात.
2 / 6
फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक असते. हे लोक मनकवडे असतात आणि कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करतात. त्यांच्याकडे वाकचातुर्य असल्यामुळे सभा आणि समोरच्याचे मन जिंकण्यात ते पटाईत असतात. सर्व वयोगटातील लोकांशी त्यांची सहज मैत्री होते. हे लोक अत्यंक प्रेमळ असतात. ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी एकनिष्ठ असतात. परंतु, अनेक प्रकारच्या कटु प्रसंगांमुळे ते प्रेमाची निवड करताना गांगरून जातात आणि निर्णय घेताना डळमळीत अवस्थेत असतात. ते स्वत: स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि आपल्या जोडीदारालाही स्वातंत्र्य उपभोगू देतात. या लोकांना बाह्य सौंदर्य नाही, तर मनाचे सौंदर्य आकर्षित करते.
3 / 6
संवेदनशील मन चटकन प्रतिक्रिया देते. त्यानुसार हे लोक शिघ्रकोपी असतात. त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. परंतु, जितक्या लवकर रागवतात, तितक्याच लवकर शांत होतात. मात्र, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींचे शेअरिंग करत नाहीत, त्यामुळे बऱ्याचदा दु:खी असतात आणि मनातल्या मनात कुढत राहतात. हीच बाब त्यांच्या करिअरच्या आड येते. त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला, तसेच प्रसंगी बोलून मोकळे व्हायला शिकले पाहिजे.
4 / 6
या लोकांमध्ये कला, तंत्रज्ञान, शिक्षण अशा अनेक गुणांची खाण असूनही ते स्वत:ला ओळखण्यात कमी पडतात. परंतु, कोणी त्यांना त्याची जाणीव करून दिली, तर ते आपापल्या क्षेत्रात अव्वल स्थान मिळवण्यापर्यंत मजल मारतात. डॉक्टर, लेखक, शिक्षक, चित्रकार, संगणक तज्ञ, अभिनेता इ. क्षेत्रात ते नाव कमावतात. परंतु, दिरंगाई हा शब्द त्यांच्या पाचवीला पुजलेला असल्यामुळे सगळ्या गोष्टी मिळतात, परंतु उशिरा...!
5 / 6
अत्यंत विश्वसनीय व्यक्ती म्हणून या लोकांवर विश्वास ठेवू शकता. त्यांना सांगितलेल्या गोपनीय गोष्टी ते कधीच बाहेर येऊ देत नाहीत. मैत्री किंवा कोणत्याही नात्याबाबतीत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. कारण, द्वेष, मत्सर, कुरघोडी यापासून ते पुष्कळ दूर असतात. या लोकांनी व्यक्तिमत्त्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे. कोणत्याही स्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जुने विचार सोडून नवीन विचारधारेप्रमाणे परिस्थितीशी जुळवून घेतले, तर त्यांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांनी या महिन्यात जन्मलेल्या आणि कर्तृत्त्वाने गाजलेल्या लोकांचा आदर्श ठेवला पाहिजे. जसे की--सुषमा स्वराज, भीमसेन जोशी, जगजीत सिंग, मधुबाला, आशुतोष गोवारीकर, इ.
6 / 6
दानशूर, अशीही या लोकांची ख्याती आहे. कोणी काही मागितले, तर देताना ते मागचा पुढचा विचार न करता खुशाल देऊन मोकळे होतात. कोणाकडून घेण्यापेक्षा देण्यात आनंद मानतात. गरजवंताला दान करण्यासाठी, मदत करण्यासाठी ते हिरीरिने पुढे असतात. यांना सेव्हिंग, गुंतवणूक हे शब्द माहित नसतात. याचा अर्थ ते उधळपट्टी करतात असे नाही, तर दुसऱ्यांसाठी खर्च करण्यात ते आनंद मानतात.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष