शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Festival 2021: काय सांगता! ५ हजार वर्षांपासून केले जाते पार्थिव गणपती पूजन? वाचा, काही अद्भूत तथ्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 2:15 PM

1 / 13
चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता झाली की, सर्वांना वेध लागतात, ते सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. यंदाच्या वर्षी शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेश चतुर्थी आहे. संपूर्ण मराठी वर्षात श्रीगणेश अवताराचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
2 / 13
एक वैशाख पौर्णिमा, दुसरा भाद्रपद चतुर्थी आणि तिसरा म्हणजे माघ चतुर्थी. यातील सार्वजनिकरित्या, मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तो म्हणजे भाद्रपद गणेश चतुर्थी. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते.
3 / 13
एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता. असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. गणेशासंदर्भात अनेक पौराणिक कथा दिसून येतात.
4 / 13
शिव आणि विष्णूंचे अवतार झाले, त्याचप्रमाणे गणेशाचेही अनेक अवतार झाले आहेत. प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेणारे गणपती हे आदिदेव आहेत. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन, अशी गणेशाची प्रमुख नावे असल्याचे सांगितले जाते. या प्रत्येक नावाच्या मागे एक आख्यायिका आहे.
5 / 13
घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, महर्षी व्यासांनी महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणपतीकडून ते लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली, असे सांगितले जाते.
6 / 13
महाभारताचे लिखाण काम करताना महर्षी व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या. गणपतीला आपल्या लेखन गतीबाबत आत्मविश्वास होता. गणपती महर्षी व्यासांना म्हणाले की, तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल, तर मला कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. ही अट आपणास मान्य असेल, तर आणि तरच लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपतीने घातली.
7 / 13
व्यास महर्षी होते. गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. महर्षी व्यास गणपतीला म्हणाले की, आपली अट मला मान्य आहे. मात्र, मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली. गणपती तयार झाले आणि त्यांनी महाभारत लेखनाचा श्रीगणेशा केला.
8 / 13
महर्षी व्यास नेमके काय सांगताहेत हे समजून घ्यायला अनेकदा गणपतीला विलंब व्हायला लागला. संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते. कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली.
9 / 13
वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारत लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महर्षी व्यासांनी सांगितलेले महाभारत लिहून काढले म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.
10 / 13
गणेशाने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात अवतार घेतल्याचे सांगितले जाते. गणेशाने सतयुगात कश्यप आणि अदितीकडे महोत्कट विनायकाच्या अवतार धारण केला. या युगात गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली आणि आपल्या अवतारकार्याची सांगता केली. गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले.
11 / 13
तर, द्वापारयुगात गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असेही संबोधले जाते. कारण याच युगातील अवतारात त्यांनी महाभारत लिहिले होते, असे सांगितले जाते. दरम्यान, सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला.
12 / 13
दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले.
13 / 13
सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले.
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती