शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Utsav 2021: घरातील गणपती बाप्पाची ‘अशी’ काळजी घ्या अन् भरघोस लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 1:22 PM

1 / 12
बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. गणपती ही सर्वांनाच अगदी हवीहवीशी वाटणारी देवता आहे.
2 / 12
भाद्रपद चतुर्थी, माघ चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि दर महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीची उपासनेचे मुख्य सण-उत्सव. विघ्नहर्ता, सुखकर्ता अशी ओळख असणाऱ्या गणपतीची दररोज कोट्यवधी कुटुंबात पूजा केली जाते. यंदाच्या वर्षी १० ते १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. (vastu shastra)
3 / 12
गणेशोत्सवाच्या काळात विविध रुपात गणपती पूजन केले जाते. गणपती एवढी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केली जाणारी अन्य कोणतीही देवता आपल्याला दिसत नाही. सर्वधर्मियांमध्ये गणपतीविषयी आस्था, प्रेम, श्रद्धा असल्याचे दिसून येते. विघ्नहर्ता गणेशाची घरात स्थापना करताना काळजी घेण्याबाबत वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.
4 / 12
वास्तुदोष निवारण्यातही गणेश मूर्ती, प्रतिमा यांचे विशेष महत्त्व असल्याचे वास्तुशास्त्र मानते. केवळ घर नाही, तर कार्यालय, दुकान, कारखाना, प्रकल्प या ठिकाणी वास्तु यंत्रांसोबत गणेशाचीही विभिन्न रुपात स्थापना केली जाते. सुख, शांतता, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करण्याचा त्यामागील उद्देश असतो. मात्र, वास्तुदोषासाठी गणेश स्थापना करताना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वास्तुशास्त्र याबाबत नेमके काय भाष्य करते? जाणून घेऊया...
5 / 12
वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घराचे प्रवेशद्वार जर दक्षिण दिशेला असेल, तर ते दक्षिणमुखी भवन नावाने संबोधले जाते. दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वारामुळे घरात काही समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी घरातील प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस आत व बाहेर अशा दोन्ही ठिकाणी गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी.
6 / 12
गणपती स्थापनेमुळे वास्तुदोष दूर होतो. काही दिवसातच फलप्राप्ती होण्यास सुरुवात होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मात्र, गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती ही मध्यम आकाराची असावी, ती अधिक लहान किंवा अधिक मोठी नसावी, असे सांगितले जाते.
7 / 12
वास्तुशास्त्रानुसार, गणपतीची छबी असलेले तोरण प्रवेशद्वारावर बांधणे शुभ मानले जाते. सण-उत्सव, व्रत-वैकल्यांच्या काळात गणेशाची छबी असलेल्या तोरणाला विशेष महत्त्व प्राप्त होते, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रात याला अत्यंत शुभ मानले गेले आहे.
8 / 12
वास्तुदोष दूर होण्यास तसेच वाईट नजर लागण्यापासून घराचे संरक्षण होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. मात्र, हे तोरण नियमितपणे, शक्य असल्यास दररोज स्वच्छ करावे. तसेच तोरण लावलेली जागाही नीटनेटकी ठेवावी. दोन्ही गोष्टी नियमितपणे धुतल्या जाव्यात. तोरणावर धूळ किंवा मातीचा थर जमू देऊ नये, असे सांगितले जाते.
9 / 12
वास्तुशास्त्रानुसार, गणपतीचे प्रतिरुप मानल्या गेलेल्या स्वतिकाची स्थापना कार्यालय, कारखाना, प्रकल्पाच्या ठिकाणी करणे शुभलाभदायक असते, असे सांगितले जाते. व्यापार, व्यवसाय किंवा उद्योगात वारंवार मंदी येत असल्यास गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करणे लाभदायक ठरते. गणेशाची मूर्ती, प्रतिमा स्थापन करणे शक्य नसल्यास ताम्रपत्रावरील स्वस्तिक स्थापित करावे. गणपतीची मूर्ती, प्रतिमा किंवा ताम्रपत्रावरील स्वस्तिक जे काही स्थापन केले जाईल, त्याचे नियमितपणे पूजन करावे, असे सांगितले जाते.
10 / 12
एखाद्या नवीन घरात किंवा जुन्या पण वापरात नसलेल्या घरात गृहप्रवेश करताना गणपतीची स्थापना करण्याचा सल्ला वास्तुशास्त्र देते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस, घरात प्रवेशद्वाराकडे नजर जाईल, अशा स्वरुपात गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, असे सांगितले जाते.
11 / 12
घरात गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करण्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला वास्तुशास्त्र देते. घरात एकाच स्थानावर गणपतीच्या दोन किंवा जास्त मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करू नयेत. याचा काहीही उपयोग होत नाही.
12 / 12
घर, कार्यालय, कारखाना, प्रकल्पाचे ठिकाण या स्थानांवर कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा प्रतिमा एकाच ठिकाणी स्थापन करू नयेत, असे वास्तुशास्त्र सांगते. तसेच गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करताना दिशांचे योग्य भान राखणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा, असेही सांगितले जाते.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रGanesh Mahotsavगणेशोत्सव