शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Health Tips: मन आणि शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी दररोज १६ तासांचा उपास करा; जाणून घ्या योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:39 AM

1 / 8
मनःस्वास्थासाठी सकाळी उठल्यावर उपास्य देवतेचा जप करा. हरिपाठ किंवा तत्सम एखादे स्तोत्र किंवा गीतेचे श्लोक, निरूपण, मनाचे श्लोक वाचून दिवसाची सुरुवात करा. ही सुरुवात सकारात्मकतेने झाली, तर पुढचा सबंध दिवस आनंदात जाईल. ऊर्जा मिळेल. मन स्थिर आणि शांत असेल तर शरीर देखील संतुलित राहील!
2 / 8
पौष्टिक, शाकाहारी आणि सात्त्विक आहार ही सुदृढ आरोग्याची त्रिसूत्री आहे असे समजा. ते ग्रहण करताना अन्न चावून त्याचे पाणी होईल इतपत चघळून खाल्ले पाहिजे. म्हणून अन्न प्यावे आणि पाणी खावे असे म्हटले जाते. पाणी गटागटा प्यायल्यामुळे मूत्रपिंडावर भार येतो आणि ते निकामी होतात. म्हणून ते पिताना चावल्यासारखे सावकाश प्यायले पाहिजे.
3 / 8
भूक लागली तरच खा. सतत चरत राहणे शरीरासाठी घातक ठरते. न पचलेल्या अन्नाचे मेदात रूपांतर होते. म्हणून ठराविक वेळी खावे. खाताना लक्ष देऊन खावे. बोलणे, फोन किंवा टीव्ही बघणे, पुस्तक वाचणे अशा गोष्टी टाळाव्यात, तरच अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होते. अन्न सेवन करण्याआधी त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि ते अन्न देवाचा प्रसाद समजून खावे.
4 / 8
झोपेला प्राधान्य द्या. बाकी गोष्टी मिळवता येतीलही, पण आरोग्याची हेळसांड झाली तर ती भरून काढता येणार नाही. वेळेत झोपा. त्यामुळे पचन क्रिया सुधारेल. झोपताना सगळा भार देवावर सोपवून निश्चिन्तपणे झोपा. आपण १०० टक्के प्रयत्न केले असतील तर प्रयत्नांना देवाची साथ मिळतेच. म्हणून एका मर्यादेनंतर देव काय ते बघून घेईल असे म्हणत त्याचे स्मरण करून शांत झोपा. शक्यतो १० वाजता झोपा आणि ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा!
5 / 8
दररोज १६ तासाचा उपास करा. वाचून घाबरू नका, त्यात झोपेचे आठ तास असेच निघून जातात. सायंकाळी ७ वाजता शेवटचे जेवण घ्या आणि दुसऱ्या दिवशी १० वाजता नाश्ता करा. यालाच इंटरमिटेन्ट फास्टिंग म्हणतात. हे १६ तास तुमच्या शरीरातील विषारी घटक शरीरातून बाहेर फेकतील आणि तुम्ही कोणत्याही अतिरिक्त डाएट शिवाय, औषधाशिवाय वजन नियंत्रित करू शकाल.
6 / 8
डॉक्टरांच्या मदतीने एनिमा घेण्याची पद्धत शिकून घ्या. त्यामुळे शरीरातील अनावश्यक विषारी घटक निघून जातील. शरीर शुद्धी होईल आणि तुमचे आरोग्य सुधारून आयुष्य वाढेल.
7 / 8
दररोज व्यायाम करा. व्यायामामुळे येणारा थकवा शरीरासाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्या बैठ्या जीवनशैली मुळे हृदयाची प्रक्रिया मंदावते. त्याला प्राणवायूचा योग्य रीतीने पुरवठा होत नाही. व्यायामाने हृदयाला गती मिळते, नैराश्य दूर होते, आळस दूर होतो, उत्साह संचारतो आणि पचनक्रिया सुधारते. म्हणून दररोज ३०-४५ मिनिटं आवर्जून व्यायाम करा.
8 / 8
शक्य तेवढे सर्वांचे आशीर्वाद मिळवण्याचे प्रयत्न करा. त्यासाठी सत्कर्म करा. खुशमस्करी करून आपण सुखी राहू शकत नाही, पण सत्कर्माचे समाधान आपल्या मनाला आणि शरीराला मिळते. दुसऱ्यांना आनंद द्या, त्याआधी स्वतः आनंदी राहा. उत्स्फूर्तपणे आणि मनापासून मिळालेले आशीर्वाद कधीच वाया जात नाहीत. त्यासाठी आपले मन आणि काम शुद्ध व प्रामाणिक ठेवा. जो दुसऱ्यांची काळजी वाहतो, भगवंत त्याची काळजी वाहतो. म्हणून चांगले काम करत राहा, त्याचा परिणाम तुम्हाला मनावर आणि शरीरावर निश्चितच दिसून येईल!
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स