शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही कसे 'हसता' यावरून कसे 'असता' याची पारख होते! कशी ते समुद्र शास्त्राच्या आधारे जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 5:38 PM

1 / 5
हसणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, हे सर्वांनाच माहीत आहे. आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच हास्यामुळे चिंता आणि तणावही दूर होतो. काही लोक स्मित करतात. तर काही मोठ्याने हसतात. काही जण छद्मीपणे, कुत्सितपणे हसतात. तर काही जण गडगडाटी हसतात. असे हास्याचे अनेक प्रकार सांगितले आहेत. माणसाचे खरे चारित्र्य हसण्यावरून ओळखता येते. कारण खोटे हसू फार काळ टिकत नाही आणि खरे हसू फार काळ दाबून ठेवता येत नाही. चला तर, समुद्र शास्त्राच्या आधारे हास्याचे कंगोरे समजून घेऊ.
2 / 5
समुद्रशास्त्रानुसार जी व्यक्ती खळखळून हसते ती व्यक्ती मनाने पारदर्शक असते. ती तापट असू शकेल परंतु राग क्षणिक असतो. अशा लोकांमध्ये इतरांप्रती सहकार्य, सेवा आणि समर्पणाची भावना असते. याशिवाय असे लोक समोरच्याशी जुळवून घेताना नेहमी पुढाकार घेतात. तसेच, असे लोक संवेदनशील असल्यामुळे इतरांना त्रास देत नाहीत. इतरांना फसवणे त्यांच्या स्वभावात नाही. असे लोक प्रेमाच्या नात्याला खूप महत्त्व देतात.
3 / 5
जे लोक खिदळत असतात, परंतु त्यांचे हसणे हे दुसऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवणारे असते. असे लोक सतत दुसऱ्यांची उणी दुणी काढत आनंद घेत हसतात. अशा लोकांवर विश्वास ठेवू नये. असे लोक फसवणुकीत पुढे असतात. तसेच, ते सगळीकडे आपला फायदा कसा होईल याच विचारात असतात. त्यामुळे अशा लोकांशी मैत्री ठेवतानाही सतर्क राहा.
4 / 5
आजच्या काळात गडगडाटी हास्य ऐकायला मिळणे दुर्लभ होत चालले आहे. कारण असे हसणारी माणसे प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेणारी असतात. मेहनत करण्यात पुढे असतात. हे लोक कठोर परिश्रमाने सर्वात कठीण लक्ष्य देखील साध्य करतात. हसणारे आणि हसवणारे लोक मनमिळाऊ असतात. ते सर्वांना हवेहवेसे वाटतात. लोक त्यांच्या येण्याची वाट पाहतात. त्यांच्या येण्याने मैफल सजते, मैत्री रंगते. असे लोक स्वतःचं दुःखं बाजूला ठेवून इतरांना आनंद देण्यात धन्यता मानतात. त्यांच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू शकतात.
5 / 5
स्मित करणारी, मोजकं, नेमकं हसणारी माणसं विचारी असतात. असे लोक नेहमी संयमाने काम करतात. ते पटकन कोणात मिसळत नाहीत. असे मृदू हसणारे लोक कठीण प्रसंगातही संयम गमावत नाहीत. तसेच, असे लोक स्थिर स्वभावाचे असतात. सर्वात कठीण कामे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्यांच्या स्वभावात अवखळ पणा नसतो. ते मत प्रदर्शन करताना पूर्ण विचारांती करतात आणि विचारल्यावरच करतात. असे लोक कोणत्याही क्षेत्रात उच्च पदापर्यंत पोहोचतात.