शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अभिजित मुहुर्तावर सूर्याकडे झेप; चंद्रयान-३ प्रमाणे आदित्य L1 ची ‘हनुमान उडी’ अभूतपूर्व ठरेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 7:19 AM

1 / 9
ISRO Aditya-L1 Mission: चंद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे. आता इस्रो सूर्याकडे जाण्याच्या तयारीत आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य-एल १ अंतराळयान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित होत आहे. सूर्यावरील वातावरणाची दूर अंतरावरून निरीक्षणे नोंदविण्यासाठी आदित्य-एल १ हे अवकाशयान बनविण्यात आले आहे. ते सौरवायूच्या स्थितीचीही नोंद करणार आहे.
2 / 9
पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावरील लॅगरेंज पॉइंट ‘एल-१’ येथून ‘आदित्य-एल १’ यान अभ्यास करणार आहे. भारताने हाती घेतलेली ही पहिलीवहिली मोहीम असून त्यासाठी स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सूर्याचा सर्वांत बाह्य थर कोरोना तसेच फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअरस यांचा अभ्यास आदित्य-एल १ मधील सात उपकरणांद्वारे केला जाणार आहे.
3 / 9
या मोहिमेत एक मोठा धोका आहे. कारण यानाचा वेग नियंत्रित करता नाही आल्यास ते थेट सूर्याकडे जात नष्ट होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पाचव्या शतकात लिहिलेल्या वराहमिहिराच्या मेदिनी ज्योतिष ग्रंथ बृहत्संहिताच्या तिसऱ्या अध्यायात ‘आदित्य-चार-अध्याय’मध्ये सूर्यावरील डागांना ‘तमस कीलक’ म्हटले आहे.
4 / 9
या तामस कीलक म्हणजे सूर्याचे ठिपके दिसल्यानंतर पृथ्वीचे हवामान, पिके, पर्जन्यमान आणि इतर शुभ-अशुभ परिणाम बृहत संहितेच्या ‘आदित्य चार अध्याय’ मध्ये सविस्तरपणे दिलेले आहेत, ज्यावरून वेळोवेळी ज्योतिषीय अंदाज बांधले जातात, असे म्हटले जात आहे. ०२ सप्टेंबर रोजी अभिजित मुहुर्तावर आदित्य-एल १ अंतराळयान सूर्याकडे झेपावणार आहे.
5 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, अभिजित मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो. इस्रोच्या आदित्य-एल १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण झाल्यानंतर काहीच मिनिटांनी अभिजित मुहूर्त सुरू होत आहे, जो अतिशय शुभ मानला गेला आहे.
6 / 9
Aditya-L1 लाँचच्या वेळी वृश्चिक लग्न उदय असेल. योगायोग म्हणजे चंद्रयान ०३ च्या प्रक्षेपणाच्या वेळी वृश्चिक लग्न उदय होते. आताच्या घडीला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान आहे. सूर्याची दृष्टी मेष राशीतील मित्र ग्रह गुरूवर पडत असून, ती शुभ मानली गेली आहे. आदित्य-एल १ च्या प्रक्षेपणाच्या दिवशी श्रावण कृष्ण पक्ष तृतीया तिथी असेल. तसेच मुहुर्तांमध्ये शुभ मानले गेलेले उत्तराभाद्रपदा नक्षत्र असेल.
7 / 9
याशिवाय मुहूर्त कुंडलीमध्ये पाचव्या स्थानी नवमेश चंद्राचा लग्नेश अधिपती मंगळाची शुभ योग जुळून येत आहे. ज्यामुळे हे सौर मिशन मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, मुहूर्त कुंडलीमध्ये, गुलिकाचे दहाव्या स्थानी सूर्यासोबत समान अंशात असणे आणि मंगळ आणि शनी यांसारख्या ग्रहांची नवांश लग्नात उपस्थिती या मोहिमेत काही अडथळे निर्माण करू शकतात, असा दावा केला जात आहे.
8 / 9
दरम्यान, भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य एल ०१ साठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. इस्रोने ही माहिती दिली आहे. आदित्य-एल १ मिशनच्या मिनी मॉडेलसह इस्रोच्या वैज्ञानिकांची टीम तिरुमला श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचली.
9 / 9
- सदर मान्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषisroइस्रोAditya L1आदित्य एल १