शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पुरी रथयात्रा: जगन्नाथ मंदिराची ‘ही’ १० अद्भूत रहस्ये ऐकली आहेत का? जाणून घ्या, तथ्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 1:11 PM

1 / 15
भारतात संस्कृती, परंपरा यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच संपूर्ण देशभरात आपल्याला विविध देवतांची हजारो मंदिरे आढळून येतात. जम्मू काश्मीरमधील माता वैष्णो देवीपासून ते तामिळनाडूतील रामेश्वरपर्यंत असलेल्या मंदिरांच्या प्रतिवर्षीच्या यात्रा म्हणजे भक्तांसाठी, भाविकांसाठी, उपासकांसाठी पर्वणी असते. भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथ पुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे. हे निव्वळ भारतातच नाही, तर परदेशी भाविकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. (jagannath rath yatra 2022)
2 / 15
मंदिराची वास्तू रचना इतकी भव्य आहे की, वास्तू शास्त्रज्ञ लांबून लांबून या विषयी शोध घेण्यासाठी येतात. या मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्ये जितकी अद्भूत आहेत, तितकीच ती अचंबित करणारी आहेत. जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते. या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते. भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करत गुंडिचा मंदिर येथे जातात. (amazing facts about lord jagannath temple)
3 / 15
यंदाच्या वर्षी ०१ जुलै २०२२ पासून रथयात्रा प्रारंभ होणार आहे. जगन्नाथ रथयात्रेची सुरुवात आषाढ शुद्ध द्वितीयेपासून होते. जगन्नाथाचा हा रथोत्सव तब्बल १० दिवस सुरू राहतो. आषाढी एकादशीला या उत्सवाची सांगता होते. या यात्रेत देश-विदेशातून तब्बल ८ ते १० लाख भाविक सहभागी होत असतात, असे सांगितले जाते. (top 10 unknown amazing facts of puri rath yatra)
4 / 15
ओडिशा राज्यातील पुरी येथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर आहे. या मंदिराची उंची २१४ फूट आहे. पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्याचे दिसते. या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते. जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते.
5 / 15
भगवान जगन्नाथाच्या या मंदिराची उभारणी १० व्या शतकात झाली होती, असे सांगितले जाते. या मंदिराला चारधाममध्येही स्थान देण्यात आले आहे. जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. सामान्य दिवसाच्या वेळी वारा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो आणि संध्याकाळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतो.
6 / 15
मात्र, पुरीतील या जगन्नाथ मंदिर परिसरातील स्थिती नेमकी उलट असते. एवढेच नव्हे, तर या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो. प्रत्येक दिवशी एक पुजारी घुमटावर असलेला ध्वज बदलतो. एका मान्यतेनुसार, ध्वज बदलण्यात एका दिवसाचा जरी खंड पडला, तरी हे मंदिर पुढील १८ वर्षांसाठी बंद होऊ शकते.
7 / 15
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाट्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मात्र, आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो.
8 / 15
सायंकाळी हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो. या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही. जगन्नाथ मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे.
9 / 15
भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक १२ वर्षांनंतर नवलेपन केले जाते. प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही. चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली, तर त्याला मृत्यू येतो, अशी लोकमान्यता आहे.
10 / 15
नवलेपनाची प्रक्रिया सुरू असते, तेव्हा देवतेच्या हृदयाची धडधड ऐकू येते, असा अनुभव पुजारी सांगतात. एका मान्यतेनुसार, श्रीकृष्णाला कंस मामाने मथुरेत बोलावले होते. तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेसह मथुरा नगरीत गेले होते. त्याचे स्मरण म्हणून ही रथयात्रा आयोजित केली जाते, असे सांगितले जाते.
11 / 15
भगवान जगन्नाथाच्या रथांची भव्यता मोहून टाकणारी आहे. या सर्व रथांचे संपूर्ण बांधकाम लाकडी असते. या रथांचे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचा धातू वापरला जात नाही, असे सांगितले जाते. या रथयात्रेत बलराम हे थोरले बंधू असल्यामुळे त्यांचा रथ सर्वांत पुढे असतो. याला तालध्वज, असे म्हटले जाते.
12 / 15
मध्यभागी सुभद्रेचा रथ असतो, याला दर्पदलन किंवा पद्मा रथ, असे संबोधले जाते. सर्वांत शेवटी भगवान श्रीकृष्णांचा रथ असतो. याला नंदी घोष किंवा गरुड ध्वज, असे म्हटले जाते. दोन्ही भावांची लाडकी बहीण सुभद्रा दोन भावांची संरक्षणात यात्रा करते, अशी मान्यता आहे.
13 / 15
या रथांपैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बलरामांचा रथ ४५ फूट उंच असतो. तर, सुभद्राच्या रथाची उंची ४३ फूट असते. जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते. मात्र, येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही. दररोज लक्षावधी भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात. स्वयंपाकघरात अन्न शिजविण्यासाठी ७ भांडी एकमेकांवर ठेवली जातात.
14 / 15
भल्यामोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनविणारे ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० मदतनीस एकत्ररीत्या काम करतात. जगन्नाथांचे भाविक केवळ भारतातच नाही, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे जगन्नाथाची मुख्य यात्रा पुरी येथे होत असली, तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाते. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही या यात्रेचे आयोजन केले जाते.
15 / 15
भारतावरील परकीय आक्रमणांचा इतिहास सर्वांनाचा माहिती आहे. याच एका आक्रमणामुळे जगन्नाथ मंदिर सुमारे १४४ वर्षे बंद होते. दररोजचे पूजनही बंद होते. मात्र, आद्य शंकराचार्यांनी हे मंदिर खुले केले आणि दररोजची पूजाही सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत जगन्नाथ मंदिराची परंपरा कधीही खंडीत झालेली नाही, असे सांगितले जाते.
टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्राpuri-pcपुरी